औरंगाबाद जिल्ह्यात तुफान पाऊस, जुई नदीला पूर, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प
जुई नदीला आलेल्या या पुरात नदीवरील पूल गेला वाहून गेल्याची घटना घडली आहे. पूलच वाहून गेल्यामुळे औरंगाबाद-जळगाव महामार्ग ठप्प झाला आहे.
औरंगाबाद : राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी बरसत आहेत. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाने (heavy rain) हजेरी लावली. याच पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर आला आहे. जुई नदीला आलेल्या या पुरात नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. पूलच वाहून गेल्यामुळे औरंगाबाद-जळगाव महामार्ग ठप्प झाला आहे. (heavy rain washed away bridge of Jui river in Aurangabad)
जुई नदीला पूर, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरासह इतर ग्रामीण भागात पाऊस पडतोय. आज सिल्लोड तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. याच पावसामुळे तालुक्यातील जुई नदीला चांगलाच पूर आला असून जुई नदीवरील गोळेगाव परिसरातील पूल वाहून गेला आहे. पूलच वाहून गेल्यामुळे नागपूर-जळगाव महामार्ग ठप्प आहे. येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी हटवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
औरंगाबादमध्ये तीन तालुक्यांत मुसळधार पाऊस
औरंगाबाद जिल्ह्यात आज ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड तालुक्यात अर्धा तास धुवांधार पाऊस झाला. या तिन्ही तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. तसेच पाऊस चांगला झाल्यामुळे आगामी काळातही मराठवाडा तसेच औरंगाबादेत वरुण राजाची कृपा राहावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
पुढील चार दिवस कोकण, गोव्यात अतिवृष्टी
राज्यात पुढील चार दिवस कोकण तसेच गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याने कोकण आणि महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. याच कारणामुळे मुंबई, कोकण तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे हवामान वेधशाळेने हा अंदाज वर्तविला आहे.
इतर बातम्या :
(heavy rain washed away bridge of Jui river in Aurangabad)