औरंगाबाद जिल्ह्यात किती मंत्री?, संदीपान भुमरे यांनी राज्य, केंद्राचा आकडाचं सांगितला
अजून काही वेटिंगवर आहेत, असं म्हणून संदीपान भुमरे यांनी काही राजकीय नेत्यांकडं इशारा केला.
दत्ता कानवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. संदीपान भुमरे म्हणाले, पालकमंत्री म्हणून बँक सुधारावी, अशी आमची इच्छा आहे. अशी संधी कधी येणार नाही. औरंगाबाद जिल्हा नशिबवान आहे. औरंगाबाद जिल्ह्याला दोन केंद्रीय मंत्री, तीन कॅबिनेट मंत्री, एक विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची पदं मिळाली आहेत. अजून काही वेटिंगवर आहेत, असं म्हणून संदीपान भुमरे यांनी काही राजकीय नेत्यांकडं इशारा केला.
पण, तो कुणाकडं केला. ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. त्यामुळं वेटिंगवर कोण, अशी चर्चा सुरू झाली. वेटिंगवर असलेलेसुद्धा येऊ शकतात, असंही भुमरे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर काही जण विश्वास ठेऊन येणार असल्याचं ते म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्याला 22 वर्षांनंतर स्थानिक पालकमंत्री झाला. स्थानिक पालकमंत्री मिळाला त्याचा फायदा बँकेसाठी आणि विकासासाठी करू. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील बँकेचा प्रश्न सोडविला. औरंगाबादेतही बँकेचा प्रश्न सोडवू, असं भुमरे म्हणाले.
कांद्याला 25 टनला अनुदान देत होतो. आता 50 टनला अनुदान देण्यात येणार आहे. आधी टनामागे दीड हजार रुपये अनुदान मिळायचं ते आता पाच हजार रुपये केल्याचं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.
शेतकरी कांदा लागवड करतो. विहिरीला तीन लाख रुपये होते. मी चार लाख रुपयांचं अनुदान केलं. पाचशे फुटाच्या आत विहीर खोदता येत नव्हती. ते अंतर दीडशे फुटावर आणलं. असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
फलोत्पादनच्या बाबतीत अंतर काढून टाकलं. सगळे शेतकऱ्यांसाठी काम करू. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे. माझं खातंही शेतकरी, मजुराचं खात आहे.
आम्हाला सर्व केंद्राचे नार्म आहेत. केंद्राची मदत लागेल. शेतकऱ्यांसाठी काही योजना आणता येतील. केळी, द्राक्ष, ड्रगन फ्रृट, शेवगा लागवड ही रोजगार हमी योजनेत घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.