Independence day 2023 | स्वातंत्र्यदिनापेक्षा राजकारण मोठं? औरंगाबादेत चंद्रकांत खैरे यांनी असं काय केलं?
Independence day 2023 | शिवसेना-ठाकरे गटामधील राजकीय संघर्ष. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात हायवोल्टेज ड्रामा. आजच्या दिवशी, तरी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असा भेद मिटून गेलेला असतो.
औरंगाबाद : आज देशात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. सगळ्या देशामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. सकाळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागात ध्वाजरोहणाचे कार्यक्रम सुरु आहेत. आजच्या दिवशी, तरी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असा भेद मिटून गेलेला असतो. अनेक कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर येतात. आज राजकीय टिका-टिप्पणी टाळली जाते.
राजकारण इतरदिवशी चालूच असतं. पण आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राजकारण टाळण्याकडे कल असतो. पण औरंगाबादमध्ये मात्र हे चित्र दिसलं नाही. दोन राजकीय पक्षाच्या नेत्यांमधील संघर्ष दिसून आला.
काय घडलं?
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी औरंगाबाद शहरात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. खरंतर दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले असते,.तर जनतेमध्ये वेगळा संदेश गेला असता. पण पालकमंत्री संदीपान भुमरे कार्यक्रम स्थळी येताच चंद्रकांत खैरे यांनी तिथून काढता पाय घेतला. पालकमंत्री संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात हायवोल्टेज ड्रामा दिसून आला. घटनाबाह्य पालकमंत्री आहेत असं म्हणत चंद्रकांत खैरे तिथून निघाले. शिवसेना-ठाकरे गटातील संघर्ष
चंद्रकांत खैरे स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करत असल्याचा आरोप करण्यात आला. संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या या कृतीवर टीका केली. संदीपान भुमरे हे शिवसेनेचे आमदार आहेत. मागच्यावर्षी शिवसेनेत बंड झालं, त्यावेळी ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. चंद्रकांत खैरे ठाकरे गटामध्ये आहेत. ते माजी खासदार आहेत. औरंगाबादमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते आहेत. एरवी हे दोन्ही नेते परस्परांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज निदान स्वातंत्र्यदिन आहे, हे समजून घेऊन सामंजस्य दाखवायला पाहिजे होतं.