जालना| जालन्यातील लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau ) विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम शिवाजीराव ताटे (Sangram Tate) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. तशी तक्रार त्यांच्या पत्नीने जालना पोलीस स्टेशनमध्ये केली होती. तेव्हापासून जालना पोलीस त्यांच्या शोधात होते. अखेर आज मंगळवारी संग्राम ताटे यांचा शोध लागला. मात्र संग्राम ताटे ज्या अवस्थेत सापडले, त्यावरून ते नेमके कुठे गेले होते, त्यांची अवस्था अशी का झाली आहे, असे अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. ताटे हे खंडाळा येथे अत्यंत अशक्त अवस्थेत आढलले असून तेथील पोलिसांनी जालना पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर ताटे यांना सध्या जालन्यात (Jalna police) आणले असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
संग्राम शिवाजीराव ताटे हे जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आहेत. ताटे यांना नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून बढती देण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी ते अचानक रहस्यमय रित्या गायब झाले होते. त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. तेव्हापासून पोलिसांचा शोध सुरु होता. अखेर खंडाळा येथील महामार्गावरील जुना टोलनाका येथे ते सापडले. दोन दिवसांपासून एकाच ठिकाणी पडून असल्यामुळे तसेच पुरेसे जेवण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
खंडाळा येथील एका कामगाराने ताटे यांची परिस्थिती पाहून त्यांना जेवायला दिले. आपण कोण, कुठले अशी विचारणा केली असता, ते काहीच बोलत नव्हते. पण त्यांच्या हातावर एक मोबाइल नंबर लिहिलेला होता. कामगाराने त्या नंबरवर फोन केला असता तो त्यांच्या पत्नीचा होता. त्यानंतर कामगाराने दिलेल्या माहितीवरून खंडाळा पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर जालना पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. ताटे यांना सध्या जालन्यात त्यांच्या घरी आणले असून औषधोपचार सुरु आहेत. मात्र ते दोन दिवस अशा अवस्थेत का होते, त्यांचे कुणाशी वाद झाले होते का? कुणी त्यांना धमकावण्याचा, अपहरणाचा प्रयत्न केला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, कौटुंबिक वादाच्या कारणामुळे ते अशा प्रकारे गायब झाले असावे, असे म्हटले जात आहे.
इतर बातम्या-