तोच दिवस, तेच शहर, मोठं शक्तिप्रदर्शन, वज्रमूठ विरोधात गौरवयात्रा, काय घडणार?
मविआची संयुक्त सभा आणि भाजपची सावरकर गौरव यात्रा हे दोन कार्यक्रम एकाच दिवशी एकाच शहरात आयोजित करण्यात आले आहेत. या दोन्ही कार्यक्रमांतून राजकीय पक्ष मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिंदे-भाजप (Shinde BJP) युती सरकारला आसमान दाखवण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) वज्रमूठ आवळली आहे. कोणत्याही कारणाने ही मूठ सैल पडू द्यायची नाही, असा चंग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बांधलाय. सत्ताधाऱ्यांविरोधातील रणशिंग फुंकण्यासाठी महाविकास आघाडीने संयुक्त संभांची घोषणा केली. मराठवाड्याचं प्रवेशद्वार संभाजीनगरातून पहिल्या सभेची घोषणा केली. २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सभेसाठी युद्धपातळीवर तयारी केली जातेय. मात्र त्याच दिवसापासून भाजपच्या गौरवयात्रेचंही आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राला उजाळा देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा आयोजित करण्याची घोषणा शिंदे फडणवीस यांनी केला. संभाजीनगरात ही गौरव यात्रा २ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरात शिंदे-भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचं मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
वज्रमूठीचा आवाज घुमणार
आता जिंकेपर्यंत लढायचं.. चलो छत्रपती संभाजीनगर..
पहिली झलक!
२ एप्रिल २०२३. सायं ५ वा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ.
लढेंगे भी! जितेंगे भी!!#UddhavBalasahebThackeray #shivsena #ChhatrapatiSambhajinagar pic.twitter.com/3uiUWzO6NS
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 27, 2023
महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरोधात वज्रमूठ आवळली आहे. येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील प्रदेशांनुसार एकूण सात ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. संभाजीनगरातील पहिल्या सभेची जबाबदारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देण्यात आली आहे. तर तिन्ही पक्षांच्या वतीने कार्यकर्त्यांनी सभेची तयारी सुरु केली आहे. मराठवाड्यातील सर्वच शहरांतील नागरिकांपर्यंत वज्रमूठ सभेचं निमंत्रण पोहोचवलं जातंय. संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणाऱ्या या सभेला उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
सावरकरांची गौरवगाथा
जाज्वल्य देशभक्त, ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ गाथाकार, जात्युच्छेदक, प्रखर हिंदुत्ववादी या सर्व शब्दांचा अर्थ एकच… ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’
…सावरकर गौरव यात्रा तुमच्या दारी! …तुम्हीही सामील व्हा!#VeerSawarkar pic.twitter.com/E2zf2cjeS5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 30, 2023
.. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार, भाजप-शिवसेनेतर्फे राज्यभरातून वीर सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभदेखील संभाजीनगरातून २ एप्रिल रोजी होणार आहे. शहरातील सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून संभाजीनगरातील या यात्रेला प्रारंभ होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत शहरातील तिन्ही मतदारसंघात भव्य रथातून ही यात्रा काढण्यात येईल. सावरकरांचे विचार, त्यांच्या आठवणी, चित्रफिती, सावरकरांची भाषणं या चित्ररथातून ऐकवली जातील.
राजकीय शक्तिप्रदर्शन
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राम नवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीमुळे शहरातल्या शांततेता तडा गेलाय. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही दोन गटात झालेल्या या राड्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर राजकीय नेते या घटनेसाठी परस्परांना दोषी ठरवत आहेत. येत्या दोन दिवसांनी होणारी मविआची संयुक्त सभा आणि भाजपची गौरव यात्रा यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही कार्यक्रमांतून राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.