औरंगाबादेत करुणा मुंडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, चित्ते पिंपळगावात बैठकीचे होते आयोजन
करुणा मुंडे यांनी नव्यानं काढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. संबंधित बैठक घेतली जाऊ नये, अन्यथा कारवाईच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
औरंगाबादः करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या नव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज औरंगाबादमध्ये आयोजित केली होती. मात्र ऐनवेळी कोरोना नियमांचे कारण दाखवत जिल्ह्यातील या कार्यक्रमाला पोलिसांनी (Aurangabad police) परवानगी नाकारली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगावात करुणा मुंडे यांचा कार्यक्रम नियोजित होता. त्यांनी नव्यानं काढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. संबंधित बैठक घेतली जाऊ नये, अन्यथा कारवाईच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
चिंत्तेपिंपळगावात कार्यक्रम
करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असं या पक्षाचं नाव असून लवकरच मोठा मेळावा घेणार असल्याचंही त्यांनी घोषणेत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर पक्षाचं संघटन उभं करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं असून चित्तेपिंपळगावात यासंबंधी कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद पोलीस या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरीही करुणा मुंडे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.
कोण आहेत करुणा मुंडे?
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केल्यानंतर करुणा शर्मा या काही वर्षांपूर्वी चर्चेत आल्या होत्या. यावरून धनंजय मुंडे यांना समाजातून मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. धनंजय मुंडे यांनी त्यानंतर समाज माध्यमांवर जाहीर रित्या करुणा शर्मा यांच्याशी संबंध असल्याचे आणि याविषयी कुटुंबियांना माहिती असल्याचे म्हटले होते. तसेच करुणा यांना आपले नाव देण्यास तसेच त्यांच्या दोन्ही मुलांनाही नाव देण्यास आपण तयार असल्याचेही मान्य केले होते. करुणा मुंडे या मूळच्या इंदौर येथील रहिवासी असून मुंबईत एका सामाजिक संस्थेद्वारे त्या समाजकारणात सक्रीय आहेत.
इतर बातम्या-
Election | उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा, भाजप शिवसेना नेते आमने सामने
‘मुलगी झाली हो’तील कलाकारांमध्येच दोन ‘प्रवाह’, अभिनेत्री गौरी सोनार किरण मानेंच्या समर्थनात