संभाजीनगर | 31 ऑक्टोबर 2023 : आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील समाजासाठी आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. आजच्या काळात सरकारी कार्यालयासमोर तंबू ठोकून तोडपाणी करणारे लोक कमी नाहीत, अगदी खूप इमानदार आहे असा वाटणारा माणूस सुद्धा खूप सिक्रेट लेव्हलला कसे शेण खातो हे मी अगदी जवळून पाहिले आहे. पण या काळात मनोज जरांगे सारखा निष्पाप हिरा दंड थोपटून उभा राहतो ही बाब निव्वळ एक आश्चर्य आहे. टीव्ही9 मराठीचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी प्रामाणिकपणे लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्या संघर्ष आणि साध्या जीवनशैलीचा घेतलेला हा आढावा.
मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची अवस्था समाजासमोर मांडली होती. पत्र्यांचं घर आणि अगदी महिनाभर पुरेल इतकं रेशन हीच त्यांची संपत्ती होती. ही परिस्थिती समोर आल्यानंतर समाजातील अनेक धनिकांनी मनोज जरांगे यांना देणगी स्वरूपात मदत देऊ केली. पण मनोज जरांगे ही मदत घ्यायला तयार होईनात. लोक मदत देण्यासाठी घरापर्यंत पोचले तेव्हा त्यांनी बायकोला घराला कुलूप लावून बाहेर जाऊन बसायला सांगितलं.
मी सुद्धा जेव्हा मनोज जरांगे यांना या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत यात काहीच वाईट नसतं उलट पूर्वीच्या काळी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या जाहीर मिरवणूका काढल्या जायच्या आणि मदत म्हणून त्यांना पैश्यांच्या थैल्या दिल्या जायच्या, त्या स्वीकारल्याही जात असत. एखादा निष्ठावंत व्यक्ती अशा थैल्या सामाजिक कार्याला देऊन टाकत असे. त्यामुळे या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत, अशी भूमिका मी मांडली. त्यावर मनोज जरांगे यांनी “मी फाटका म्हणून जन्माला आलोय. मला फाटका म्हणून मारायचं आहे. मला देणग्या नाही घ्यायच्या. मला फक्त आरक्षण घ्यायचं आहे” असं स्पष्ट सांगितलं…
पुढे मनोज जरांगे यांच्या जुन्या संपर्कातील बीड जिल्ह्यातील एक माजी आमदार त्यांना भेटायला आले. त्यांनी मनोज जरांगे यांना त्यांच्या एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च मी उचलतो, असं सांगितलं. त्यावर मनोज जरांगे यांनी त्याच तडफेने उत्तर दिलं, “माझ्या मुलीचं शिक्षण तुम्ही करायला तिचा काय बाप मेलाय का?” असा सवाल विचारला, आणि त्या माजी आमदारांना स्टेजवरून जायला सांगितलं.
पुढे मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या काही समविचारी मित्रांनी त्यांच्यासमोर एक संकल्पना मांडली की, मराठा आरक्षणाचा मुद्दा संपल्यावर पुढे आपल्याला काम चालू ठेवण्यासाठी एखादी सामाजिक संस्था उभी करावी लागेल. यापूर्वी अशा संस्था अण्णा हजारे, विनोबा भावे अगदी महात्मा गांधी यांनी सुद्धा उभारल्या होत्या. त्याधर्तीवर आपणही संस्था उभारावी, समाजातून निधी उभा करून एक मोठं सामाजिक कार्य निर्माण करता येऊ शकतं आणि भविष्यात आपल्या लढ्याला या संस्थेचे पाठबळ मिळत राहील. त्यामुळे संस्था फार गरजेची आहे, अशी भूमिका मांडली. यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी ठामपणे नकार दिला, “मला आयुष्यात काहीच करायचं नाही. फक्त मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे” इतकीच भूमिका स्पष्ट केली. या माझ्यासमोर घडलेल्या मनोज जरांगे यांच्या इमानदारीच्या कहाण्या आहेत.
मनोज जरांगे हा माणूस एक भाकर सुद्धा टोचून खाणारा आहे. मागे मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेतील कार्यकर्त्यांनी कोपर्डीतील आरोपींवर न्यायालयात हल्ला केला. हल्ला करणारे जेलमध्ये अडकले तेव्हा मनोज जरांगे यांनी शपथ घेतली की, जोपर्यंत माझे सहकारी सुटणार नाहीत तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरा चढणार नाही. बस तिथून पुढे दोन वर्षे मनोज जरांगे पुंडलिक नगरच्या एका होस्टेलवर मुलांच्या रूमवर राहायचे आणि तिथे विजय काकडे आणि इतर सहकारी त्यांना डब्बा आणून द्यायचे.
मी अधूनमधून त्यांना तिथे भेटायला जायचो. गेल्यानंतर विजयकडे चहा पाजायचे. मी जाण्याची आधी जर काकडे-जरांगे यांचा चहा झाला असेल तर मी गेल्यानंतर चहा डबल होईल म्हणून ते पुन्हा चहा घ्यायचे नाहीत. कारण आपल्याला संभाळणाऱ्यांना अगाऊ भुर्दंड होऊ नये म्हणून हात आखडता घेणारा हा माणूस होता. जगताना इतक्या काळजीने हा माणूस वागत असे.
आता अलिकडे उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तिथे त्यांना कुणीतरी आरोग्यला चांगले असतात म्हणून तुपात भिजवलेले पराठे आणले होते. मी घरी असताना त्याच दिवशी मला त्यांचा फोन आला, दत्ताभाऊ कुठं आहेत? मी म्हटलं घरी आहे जेवण करतोय. ते म्हणाले काय भाजी आहे? मी म्हटलं वांग्याची भाजी आहे. लगेच मनोज पाटील म्हणाले, भाऊ ते तर आपलं फेव्हरेट आहे. या घेऊन. मी डब्बा घेऊन रुग्णालयात दाखल. मनोज जरांगे पाटलांनी समोर वाढलेले पंच पक्वान्न बाजूला सारले आणि माझ्या वांग्याच्या भाजीचा डब्बा खाल्ला.
खाऊन थोडा उरला तर तोही मनोज जरांगे यांनी दुसऱ्या डब्यात काढून घेतला आणि म्हणाले दुपारी पण हाच खाणार. सायंकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला आवर्जून फोनवर सांगितले की, दत्ताभाऊ मनोजभाऊनी दुपारी तुमचाच डब्बा खाल्ला. ही एका फाटक्या माणसाची कहाणी आहेय. जो ताटातली तूप रोटी नाकारतो आणि गरिबांच्या घरातले प्रेम ओतप्रोत प्राशन करतो. हा लढवय्या मराठा आरक्षणासाठी रिंगणात उभा आहे. मराठ्यांनी निश्चिंत रहावं. कारण तुमचं भविष्य अत्यंत सुरक्षित हातांमध्ये आहे.
दत्ता कानवटे…
पत्रकार, tv9 मराठी
छत्रपती संभाजीनगर..!