निवडणुकीला वर्ष बाकी, पण औरंगाबादमधील ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये आतापासून ‘सामना’
Loksabha election 2024 : "व्हायरल झालेली यादी फेक आहे. काड्या मास्टर लोक यादी व्हायरल करतायत" ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचा आरोप. पुढच्यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरु झालीय.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केलीय. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये बैठकांच सत्र सुरु झालय. जागा वाटपाच्या मुद्यावर महाविकास आघाडीच्या काही बैठका सुद्धा पार पडल्या आहेत. पण अजून कुठला फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आमचे 19 खासदार निवडून आले होते, तुम्हाला 19 खासदार पुन्हा लोकसभेत दिसतील,. असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन ठाकरे गटाने 19 जागांवर दावा ठोकल्याची चर्चा सुरु झाली होती.
ठाकरे गटात कुरबुरी
कुठला पक्ष, कुठल्या जागेवरुन निवडणूक लढणार हे अद्याप निश्चित झालेलं नाहीय. महाविकास आघाडीत आम्ही मोठा भाऊ असल्याच राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे. दरम्यान त्याआधीच ठाकरे गटातील कुरबुरी समोर आल्या आहेत.
चंद्रकांत खैरे यांचा कोणाला टोला?
औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात धुसफूस सुरू आहे. चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना नाव न घेता टोला लगावला. “व्हायरल झालेली यादी फेक आहे. काड्या मास्टर लोक यादी व्हायरल करतायत” असं ते म्हणाले. इम्तिजाय जलील यांच्याकडून पराभव
“मी एकनिष्ठ नेता, माझा पत्ता कट होऊ शकत नाही. मी इथे असल्यानंतर अंबादास दानवे यांना कशाला तिकीट मिळेल? असा चंद्रकांत खैरे यांनी सवाल केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तिजाय जलील यांनी पराभव केला होता.