मराठवाड्याने पाहिली नाही अशी महाविराट सभा होणार, 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; जाणून घ्या, सभेचा ग्राऊंड रिपोर्ट
आजच्या सभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त संभाजीनगरला रवाना झाले आहेत. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली नांदेडसह हिंगोलीतून 60 हजार शिवसैनिक संभाजीनगरला रवाना झाले आहेत.
संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या जाहीर सभेला अवघे काही तास उरले आहेत. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. भव्य सभा मंडप तयार करण्यात आला आहे. मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात हजारो खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. सभेच्या ठिकाणीच 16 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. नाक्या नाक्यावर बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपासूनच मैदानात लोकांनी जमण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्याने पाहिली नाही, मराठवाड्याच्या इतिहासात झाली नाही, अशी महाविराट सभा संभाजीनगरात होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
चार दिवसांपूर्वी संभाजीनगरातील किराडपुरा भागात दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातील वातावरण तापलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीची सभा होणार की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, शहरातील परिस्थिती पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली, नागरिकांनी सहकार्य केलं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी किराडपुरातील परिस्थिती पूर्वपदावर आली. शहरातील तणाव दूर झाला. त्यामुळे पोलिसांनीही 15 अटींवर सभेची परवानगी दिली.
परवानगी मिळताच कामाला वेग
सभेला परवानगी मिळाल्यानंतर लगेच सभेच्या तयारीला वेग आला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रचंड मोठ्या मैदानात स्टेज बांधला गेला. मैदानात खुर्च्या टाकण्यात आल्या. ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली. सभेच्या ठिकाणच्या भोवती 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. सभेच्या ठिकाणी आणि शहरात मिळून एक हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दोन डीआयजी, आयपीसएस अधिकारी, चार डीसीपी, तीन एसीपी, 20 पोलीस निरीक्षक आणि 25 पोलीस उपनिरीक्षक या सभेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
सभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरात रॅपिड अॅक्शन फोर्स आणि तीन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून वारंवार सभेच्या परिसराची पाहणी केली जात आहे. श्वान पथकाकडून सभा मंडपासह सभेच्या परिसराची पाहणी केली जात आहे. पोलिसांना जबाबदाऱ्याही वाटून देण्यात आल्या आहेत.
बघावं तिथे झेंडे
महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील वातावरणात सभेचा फिवर निर्माण झाला आहे. संपूर्ण संभाजीनगरात तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच चौकाचौकात पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यता आल्या आहेत. या शिवाय कालपासूनच या सभेची दवंडी दिली जात आहे. लोकांना सभेला येण्याचं आवतन दिलं जात आहे. शिंदे सरकारचा पर्दाफाश होणार असल्याचं दवंडी देणारा सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक नाक्यावर, चौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर सभेची जोरदार चर्चा सुरू आहे.