फक्त वेळ अन् ठिकाण ठरवायचंय, काही दिवसात अनेक बडे नेते भाजपात; भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा
उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली. आता भाजप मुंबईला या पुरातून बाहेर काढतंय. आम्ही विकासात्मक कामे करतो. पंतप्रधान मोदीही विकासाकरिता मुंबईत येणार आहेत, असं ते म्हणाले.
औरंगाबाद: येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहेत. महाविकास आघाडीतील अनेक पक्ष रिकामे होतील. शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. भाजपच्याही काही लोक संपर्कात आहेत. येत्या काही काळात प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील. महाराष्ट्राला धक्का बसतील अशी ही नावे आहेत. हे सर्व लोक भाजपमध्ये येणार आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशे खर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख भाजपमध्ये येणार अशी चर्चा होती, त्यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. नाशिक पदवीधरमधून राजेंद्र विखे इच्छुक आहेत. त्याबद्दल भाजप सकारात्मक आहे. आज दुपारपर्यंत तुम्हाला बातमी देऊ, असं ते म्हणाले,
विधान परिषद निवडणुकीतून शिंदे गट नाराज असल्याचा प्रश्न नाही. मी रोज एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो. सगळ्यांना बोलूनच उमेदवार अंतिम होत आहे. धुसफूस आमच्यात नाही तर महाविकास आघाडीत आहे. नाना पाटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले आहेत. ते भांडत आहेत. पण आमच्यात पूर्ण समन्वय आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
भाजपनेच शिवसेना संपवली, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना संपावण्याकरिता मोदी यांना येण्याची गरज नाही. शिवसेना संपवण्याला संजय राऊत पुरेसे आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली. आता भाजप मुंबईला या पुरातून बाहेर काढतंय. आम्ही विकासात्मक कामे करतो. पंतप्रधान मोदीही विकासाकरिता मुंबईत येणार आहेत, असं ते म्हणाले.
आम्ही छोटे कार्यकर्ते शिवसेनेसाठी पुरेसे आहोत. त्यांच्याकडचे सगळे लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरेंसोबत कुणीही राहू शकत नाही. त्यांचे आमदार त्यांच्या सोबत नाहीत. जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते काय प्रकाश आंबेडकर यांना सांभाळतील? असा टोला त्यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत. त्यांना सगळं कळतं. उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्याने बदाम खाऊन मोठे झालेले नेते आहेत. उद्भव ठाकरे यांच्या रक्तातच युती टिकवणे नाही. ते कुणाचाच सन्मान देऊ शकत नाहीत. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत, असंही ते म्हणाले.