औरंगाबादः राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा गरज पडली तर त्यांच्या वयाचा विचार न करता धोतरही फेडू, असा इशारा औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील (Vinod Patil) यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबदद्लच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) चांगलेच घेरले गेले आहेत. राज्यपालांची तत्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे होत आहे. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वादंग उठले आहे. चाणाक्यांशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल आणि समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, गुरुंच महत्त्व मोठं असतं, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलेलं आहे. राज्यपालजी, आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. भारताचे पंतप्रधानांना विनंती आहे, आवाहन आहे की, तात्काळ अशा राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू. एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो. ‘
समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, या कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्र पोस्ट करत राज्यपालांचं म्हणणं खोडून काढलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे स्पष्ट झाले असून शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यात गुरु शिष्याचे नाते असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नाशिक राष्ट्रवादीनेदेखील हा मुद्दा उचलून धरत राज्यपाल हटाव मोहीम अधिक आक्रमक केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांनी आपलं विधान तत्काळ मागे घ्यावं, अशी मागणी केली आहे.
राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील आकाशवाणी चौकात रस्त्यावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे आकाशवाणी चौकात काही काळ तणावाचे वातावरण होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. येथील तापडिया रांगमंदिरात एक दिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन आयोजित कऱण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. आपला समाज आणि राष्ट्र बलशाली होण्यासाठी संत विचारांचा प्रवाहीपणा आवश्यक असल्याचं सांगून राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात समृद्ध गुरुपरंपरा चालत आलेली आहे. मानवी जीवनात सद्गुरू लाभणे ही मोठी उपलह्झी आहे. चाणाक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरु का बडा महत्त्व होता है, असं वक्तव्य राज्यपाल यांनी केलं होतं.
इतर बातम्या-