स्वस्त MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, त्यानुसार बदल करणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन!
सध्या शुल्क रचनेला कायद्याचा आधार आहे. पण युक्रेनमधील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांची आवश्यक ती नोंद राज्य सरकारने घेतली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतरच त्यावर बोलता येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
औरंगाबादः रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine war) युद्ध स्थिती उद्भवल्यानंतर आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी (MBBS Education) गेले असल्याची माहिती प्रकर्षाने पुढे आली. भारतातील तब्बल 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी गेले होते. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या कोर्ससाठी का जातात, याचा अभ्यास केला गेला. त्यानंतर युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण (Medical Education) भारताच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि दर्जेदार असल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता युक्रेनमधील स्वस्त आणि दर्जेदार MBBS च्या पॅटर्नचा अभ्यास करणार, त्यानुसार आपल्या येथील शिक्षणात बदल करणार असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिलं. काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
युक्रेन पॅटर्नची मराष्ट्राने नोंद घेतलीय- अमित देशमुख
औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलताना अमित देशमुख म्हणाले, मराठवाड्यासह राज्यातील हजारो तरुण युक्रेनणध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले असल्याचे युद्धामुळे समोर आले. यापूर्वी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्यांची संख्या एवढी मोटी आहे, हे माहितीच नव्हते. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याचे स्पष्ट झाले. तेथील शुल्क रचना आणि राज्यातील शुल्क रचना याची माहिती घेतली जाईल. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्क रचना करण्यासाठी राज्यात सेवानिवृत्त न्यायाधीश हे प्रमुख असतात. सध्या शुल्क रचनेला कायद्याचा आधार आहे. पण युक्रेनमधील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांची आवश्यक ती नोंद राज्य सरकारने घेतली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतरच त्यावर बोलता येईल.
युक्रेनच्या MBBS चं वैशिष्ट्य काय?
युक्रेनमधील MBBS अभ्यासक्रमाचे शुल्क भारतातील शुल्कापेक्षा खूप कमी आहे. खासगी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. अमेरिकेत 8 कोटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडातदेखील हा खर्च 4 कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र युक्रेनमधील MBBS ची डिग्री 25 लाख रुपयांत मिळते. तसेच प्रात्यक्षिकांवर आधारीत शिक्षण पद्धतीमुळे येथील शिक्षणाचा दर्जाही उत्कृष्ट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच दरवर्षी भारतासह अनेक देशांचे विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात.
इतर बातम्या-