‘फेसबुक आमदार’ आणि ‘फेसबुक पिंट्या’, भाजप-राष्ट्रवादीचे आजीमाजी आमदार समोरासमोर; काय आहे वाद?
परभणीत भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आमने सामने आले आहेत. दोघांनीही एकमेकांवर फेसबुकवरून टीका केली आहे. एकाने दुसऱ्याला फेसबुक आमदार संबोधले. तर दुसऱ्याने फेसबुक पिंट्या.
परभणी : परभणीतील पारंपारिक हाडवैरी असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आमनेसामने आले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये फेसबुकवरून भांडण जुंपले आहे. भांबळे यांनी मेघना बोर्डीकर यांचा उल्लेख फेसबुक आमदार असा केला आहे. त्यामुळे बोर्डीकर या चांगल्याच भडकल्या असून त्यांनीही भांबळे यांना जशास तसे उत्तर दिलं आहे. मेघना बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांचा उल्लेख फेसबुक पिंट्या असा केला आहे. त्यामुळे सध्या परभणीत फेसबुक आमदार आणि फेसबुक पिंट्या या कोट्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
परभणीच्या जिंतूर येथे “फेसबुक” वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप समोरासमोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी एका कार्यक्रमात जिंतूर- सेलू विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना फेसबुक आमदार म्हणून संबोधले. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी माजी आमदार विजय भांबळे यांचा फेसबुक पिंट्या असा उल्लेख केला. कट्टर वैरी असलेले बोर्डीकर- भांबळे या निमित्ताने परत एकदा चर्चेत आले आहेत.
वैर फार जुनं
परभणीच्या जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विजय भांबळे आणि बोर्डीकर कुटुंबीयांचा वैर फार जुना आहे. जिंतूर मतदारसंघात अनेक वेळा आमदार राहिलेले रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांचं जुना वैर आहे. आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या विरोधात सलग तीनदा भांबळे यांनी निवडणूक लढवली. त्यात दोन वेळा रामप्रसाद बोर्डीकर यांनी भांबळे यांचा पराभव केला. मात्र 2014 ला विजय भांबळे यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव करत विजय संपादित केला होता.
निवडणुका दिसताच वाद सुरू
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे- बोर्डीकर या आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात उभ्या टाकल्या आणि भाजपच्या तिकिटावर मेघना बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांचा पराभव करत विजय मिळवला. भांबळे-बोर्डीकर यांचे समर्थक अनेक वेळा या ना त्या कारणावरून समोरासमोर येतात.
मग ते सोसायटीच्या निवडणुका असो, ग्रामपंचायत असो अथवा झेडपी. अनेक वेळा या दोन्ही गटात राडा झाला आहे. आता विधानसभा निवडणूक जशीजशी जवळ येत आहे तसातसा दोघांमधला संघर्ष पुन्हा दिसून येत आहे. फेसबुक आमदार आणि फेसबुक पिंट्या या विधानावरून परत बोर्डीकर भांबळे वाद उफाळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.