Aurangabad | खुर्ची जाण्याची वेळ आली की संभाजीनगरचा निर्णय, खा. इम्तियाज जलील यांचा भर सभेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसवर निशाणा
औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण सुरु असल्याचा आरोप करताना खा. जलील म्हणाले, ' या शहराला एक इतिहास आहे, पण 30 वर्षांपासून या शहराचं नाव बदलण्याचं राजकारण सुरू केलं...
औरंगाबादः खुर्ची जाण्याची वेळ आली तेव्हा यांना औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय सूचला. त्यावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गप्प बसणं हे संतापदायक असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केला. सत्ता जातानाच शिवसेनेनं औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला, अशा शब्दात शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगाबादमध्ये आज खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतराच्या (Aurangabad name change) विरोधात मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने मुस्लिम आणि सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात हजर होते. आमच्यासोबत जे आलेत, त्यांचं स्वागत आणि जे नाही आलेत त्यांनाही मी पाहून घेईन, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. औरंगाबादवर एवढंच प्रेम असेल तर आधी हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करा, मग आम्ही स्वतः संभाजीनगरच्या नावाचा प्रस्ताव घेऊन येऊ, असा खोचक टोलाही खा. जलील यांनी लगावला.
औरंगाबादच्या नावावरून राजकारण…
औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण सुरु असल्याचा आरोप करताना खा. जलील म्हणाले, ‘ या शहराला एक इतिहास आहे, पण 30 वर्षांपासून या शहराचं नाव बदलण्याचं राजकारण सुरू केलं, इतके वर्षे शहराचे नाव बदलले नाही पण खुर्ची जाण्याची वेळ आली आणि नाव बदलण्याचा निर्णय घेतला नंतर दुसरी सेना शिंदे सेना आली ते म्हणाले त्यांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला आम्ही निर्णय घेणार पण 2014 ला याच सेना भाजपची सत्ता होती तेंव्हा हा निर्णय घेतला नाही. महापुरुषांच्या नावाचा वापर आम्ही राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला नाही : तुम्हाला संभाजी महाराज यांचे नाव द्यायचे असेल तर एक शहर आंतराष्ट्रीय दर्जाचे बनवा आणि मग त्या शहराला संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी प्रस्ताव आम्ही घेऊन येऊ…
औरंगाबादचा निर्णय या शहरातील जनता घेईल..
औरंगाबादच्या नावाचा निर्णय या शहरातील जनतेला घेऊ द्या अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. यासाठी मतदान घेतलं जावं, असंही ते म्हणाले. आज नामांतरविरोधी समितीच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चातही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘हा देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालेल.. तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो जनतेला मान्य करावा लागेल… असं तुम्हाला वाटत असेल.. तर या लोकांचे प्रश्न आधी समजून घ्या. काही निर्णय घ्यायचा असेल तर औरंगाबादची जनता घेईल. आमच्यावर निर्णय लादू नका, असा इशारा खा. जलील यांनी दिला.