MIM On Raj Thackeray : जीभ आम्हालाही आहे.. आम्हीही बोलू शकतो, पण… राज ठाकरे यांना MIM खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा
मुस्लीम समाजाला विनंती करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले,'आपल्याला काही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. विरोध करण्याचं कारण नाही. आपण या देशात राहतो. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाची अंमलबजाणी करावी.

औरंगाबादः राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम (MNS Ultimatum) दिला असून येत्या 04 मे पर्यंत ही कृती झाली पाहिजे, असा इशारा दिला आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोलिसांना, महाराष्ट्र सरकारला हा इशारा दिला आहे, त्यामुळे मुस्लिम (Muslim) समाज यावर प्रतिक्रिया देणार नाही. पण राज ठाकरे यांनी जी काही भाषा वापरली आहे, त्याचा अर्थ सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे, असंही खासदार इम्तियाज जलील यांनी आवर्जून सांगितलं. जे काय व्हायचं आहे ते एकदा होऊन जाऊ दे… असं राज ठाकरे म्हणाले, याचा अर्थ काय? आम्हालाही जीभ आहे. आम्हीही बोलू शकतो. पण बोलणार नाही, कारण यातून समस्या सुटणार नाहीत. अशा समस्यांना कधीही शेवट नसतो. त्यामुळे आम्ही बोलणार नाहीत, पण सरकारने यावर योग्य निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया एमयआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
MIM ची संयमित प्रतिक्रिया
राज ठाकरे यांच्या भाषणावर मुस्लिम समाजाची काय प्रतिक्रिया उमटते यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र औरंगाबादच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अत्यंत संयमाने प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमबाबत निर्णय घेईल. राज ठाकरे यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून महाराष्ट्र सरकारला दिला आहे.विशेषतः गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा इशारा दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने यावर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नाही. विरोध करण्याचीही गरज नाही, अशी अत्यंत संयमित प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. तसेच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिलेत, पण हे समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न असल्याची टीका खासदार जलील यांनी केली.
तरुणांनी ठरवावं यावर काय प्रतिसाद द्यावा…
राज ठाकरे यांच्या आवाहानाला तरुणांनी प्रतिसाद द्यावा की नाही हे त्यांनी ठरवावं असं सांगताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ युवापिढी जी नोकऱ्यांसाठी भटकत आहे. त्रस्त आहे, त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याऐवजी आपण त्यांना मिसलीड करण्याचं, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे तर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची होती? भाजप जे काही करत आहे. 2014 ते 2019 पर्यंत त्यांचं सरकार होतं. तेव्हा भाजपने याबाबतीत काही केलं नाही… मग आताच का हे सगळं आठवतंय, असा सवाल खासदार जलील यांनी केला.
‘कार्यकर्त्यांवर केसेस होणार.. हे अयोध्येला जाणार’
मुस्लीम समाजाला विनंती करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले,’आपल्याला काही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. विरोध करण्याचं कारण नाही. आपण या देशात राहतो. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाची अंमलबजाणी करावी. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यूमध्ये जाऊ शकता. पण एकदा सुप्रीम कोर्टानं जो काय निर्णय दिलाय, त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकत नाही. आज युवकांना जे आदेश दिले जात आहेत. तुम्ही समाजात तेढ निर्माण करणार आहात. जे पोरं तिथे लाऊड स्पीकर लावणार आहेत. त्यांच्यावर केसेस आणि आपण एसी केबिनमध्ये बसणार. आम्ही अयोध्येला जाणार.. हे चुकीचं आहे.. असा इशारा खासदार जलील यांनी दिला.