औरंगाबाद : औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराच्या मुद्द्याबदल आज महत्त्वाची बातमी समोर आली. केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामांतराला हिरवा कंदील दिल्याची बातमी समोर आलेली. पण ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याबद्दल महत्त्वाचं ट्विट केलंय. त्यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. केंद्र सरकारने फक्त औरंगाबाद शहराच्या नामांतराला मंजुरी दिली आहे का? जिल्ह्याचं नाव औरंगाबाद असंच असणार आहे का? असा प्रश्न केलाय. दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये केंद्र सरकारच्या ऑर्डरचा फोटो देखील ट्विट केलाय. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यात आता मोठा ट्विस्ट आलाय.
“हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलंय.
हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा @Dev_Fadnavis जी! pic.twitter.com/4OK7E28KcD
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 24, 2023
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. औरंगाबादसह उस्मानाबाद (Osmanabad) शहराचं नाव धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. या दोन्ही शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतरासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव असं म्हटलं जाणार आहे. सर्व शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख केला जाईल.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं, अशी मागणी केलेली. बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 मे 1988 रोजी सभा झालेली. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची मागणी केलेली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून ही मागणी लावून धरण्यात आली होती. औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटायचं. अखेर राज्य सरकारने याबाबत निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील नामांतराला मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंडखोरी केली आणि ते 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकी घेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबद्दल निर्णय घेतलेला. त्यानंतर काही दिवसांत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात नव्याने अस्तित्वात आले. त्यावेळी नव्या सरकारच्या झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत नामांतराबद्दलचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारने राजीनाम्याआधी घाईत निर्णय घेतला. त्यामुळे तांत्रिक अडचणींचे कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा त्याबाबतचा निर्णय घेतला.
राज्य सरकारने नामांतराबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दलचा प्रस्ताव केंद्रात पाठवण्यात आलेला. अखेर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडून देखील मान्य करण्यात आलाय. त्यामुळे औरंगाबाद शहराला आता छत्रपती संभाजीनगर हे नवं नाव मिळालं आहे आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव हे नाव मिळालं आहे.