Video | गळ्यात पैशांची माळ, नोटांची उधळण, पैसे घ्या.. विहिरी द्या, संभाजीनगरात सरपंचाचं लक्षवेधी आंदोलन
लाचलुचपत विभाग, पंचायत समितीचे अधिकारी यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केलेलं हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरतंय.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फुलंब्री (Fulambri) पंचायत समितीसमोर एका संतप्त सरपंचाने (Sarpanch) अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. सरपंच गळ्यात २ लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून आले. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात. सरकार या अधिकाऱ्यांना दीड दीड लाख रुपये पगार देत असूनही यांना विहिरी मंजूर करून घेण्यासाठी गरीब शेतकऱ्याचे पैसे लागतात, असा आरोप या सरपंचाने केलाय. अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आज २ लाख रुपये उधळतोय, हे पैसे घ्या आणि विहिरी द्या. अजूनही नाही काम झालं तर शेतकऱ्यांकडून आणखी पैसे आणतो , तुम्हाला देतो पण शेतकऱ्यांना विहिरी द्या, अशी व्यथा मांडणारं आंदोलन या सरपंचाने केलंय. लाचलुचपत विभाग, पंचायत समितीचे अधिकारी यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केलेलं हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरतंय.
कोण आहेत हे सरपंच?
फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी आलेले सरपंच आहेत मंगेश साबळे. गेवराई पायगा येथील हे अपक्ष सरपंच आहेत. मी पैसे वाटून निवडून आलेलो नाही. शेतकऱ्यांचं काम करून देण्यासाठी पैसेही वाटू शकत नाहीत, त्यामुळे आज मी अशा प्रकारे व्यथा मांडतोय, अशी भावना या सरपंचाने व्यक्त केली.
नोटांची उधळण, गाऱ्हाणं मांडलं
मंगेश साबळे यांनी २ लाख रुपयांच्या नोटांची उधळण करत आपलं गाऱ्हाणं मांडलं. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही भीक मागू, अजून पैसे आणू तुम्हाला देऊ. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे. कोणत्या तोंडानं शेतकऱ्यांना पैसे मागून काम करायचं? फक्त एखादा सभापती, आमदाराचं ऐकून पैसेवाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापहो गरीबाचं काम कोण करणार, तुम्ही 20-20 लाख रुपये एका वर्षाला घेता, बारवर नाचणारीवर पैसा फेकला जातो, तो बेवारस असतो असं ऐकलंय, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाची किंमत नाही. शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे….
इथं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना 50-60 हजार रुपये द्यायचे. यांना पेंशन पायजे. दीड-दीड लाख रुपये पगार आहेत आणि विहिरी मंजूर करायचे पैसे मागतात. मी दोन दिवसांनी सुनिल केंद्रेकरांच्या कार्यालयात जातो, शेतकऱ्यांना सोबत घेऊन अजून पैसे घेऊन जातो.. विहिरी मंजूर करून घ्या, असं गाऱ्हाणं सरपंचांनी मांडलं.