Imtiaz Jaleel | ‘दुकानदारांकडे खायला पैसे नाहीत, सरकारी खर्चातून पाट्या बदलून द्या;’ मराठी नामफलकावरुन इम्तियाज जलील यांची नाराजी
निर्णयावर एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
औरंगाबाद : राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) घेण्यात आला. या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत केले जात आहे. मात्र या निर्णयावर एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सरकारला जर मराठी (Marathi) वर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते औरंगाबादेत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात
“सरकारला जर मराठी वर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार,” अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे. राज्य सरकारने 12 जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक मराठी भाषेतूनच असावते असा निर्णय घेतला होता.
राज्य सरकारचा निर्णय काय आहे ?
कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे राज्य सरकारच्या आदेशात सांगण्यात आले आहे.
मराठी फॉन्टच्या साईजबद्दल बळजबरी करु नये
या निर्णयाचे काही नागरिकांनी स्वागत केले आहे. तर काही व्यापारी संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी राज्य सरकारने मराठी फॉन्टच्या साईजबद्दल बळजबरी करु नये अशी विनंती केली आहे. तसेच दुकानांची नावे मराठीतच असावेत याबाबत कोणताही वाद नाही. मात्र मराठी अक्षरांचा फॉन्ट इतर भाषांपेक्षा मोठा असावा या सक्तीबाबत आमचा आक्षेप आहे, अशी प्रतिक्रिया विरेन शहा यांनी दिली.
इतर बातम्या :