Nanded | नांदेड प्रशासन अशोक चव्हाणांचे वैयक्तिक नोकर!! खासदार प्रतापराव चिखलीकरांचा आरोप, लोकसभा अध्यक्षांकडे काय केली तक्रार?
या नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर नाईलाजाने मला हक्कभंग समितीकडे जावे लागेल, असा इशारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.
नांदेडः नांदेड प्रशासन (Nanded Administration) कुठल्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळत नसल्याची गंभीर तक्रार नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhalikar) यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. नांदेडचे प्रशासन कुणाचे तरी वैयक्तिक नोकर असल्यासारखे वागत असल्याची टीका चिखलीकरानी पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे नाव न घेता केली आहे. नांदेडमध्ये होणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील यांना डावलले जात आहे. कुठल्याही शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार चिखलीकरांचे नाव टाकले जात नाही. शासकीय उदघाटनाच्या ठिकाणी कोनशिलेवर नाव टकले जात नाही, खासदार म्हणून नाव टाकणे राजशिष्टाचार असताना चिखलीकरांना डावलले जात आहे. त्यामुळे खासदार चिखलीकरानी थेट लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केलीय. आपल्याला नांदेड च्या जनतेने निवडून खासदार केले पण जिल्हा प्रशासन अवहेलना करत असल्याने संसदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार करण्याचा इशारा खासदार चिखलीकरानी दिला. या तक्रारीची लोकसभा सचिवांनी गंभीर दखल घेत राज्य सरकार कडून माहिती मागवल्याची माहिती आहे.
Nanded | खासदार प्रतापराव चिखलीकरांची अशोक चव्हाणांविरोधात तक्रार, काय आहे नेमकी खंत? pic.twitter.com/BhR2PP0uD4
राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यात अशोक चव्हाण बांधकाम मंत्री झाले. त्यानंतर नांदेडच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा चव्हाण यांचा एकछत्री अंमल सुरू झाला. त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोट्यावधीचा निधी आणत अनेक विकास कामांचे उदघाटन केले. मात्र या उदघाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत खासदराच्या नावाचा साधा उल्लेखही नसल्याचा प्रकार अनेकदा घडलाय. इतकंच नाही तर केंद्र सरकारच्या निधीतील कामाच्या उदघाटनात देखील डावलल्याची तक्रार खासदार चिखलीकर यांनी केलीय. त्यांच्या या तक्रारीनंतर लोकसभा अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांची चौकशी होणार
दरम्यान , या प्रकारामुळे नांदेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांत खळबळ उडालीय. या प्रकरणी होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरलेली आहे. तर काही अधिकारी आता खासदारांची मनधरणी करण्यासाठी साई सुभाष बंगल्यावर गर्दी करत आहेत.
हक्कभंग समितीकडे तक्रार करणार
कुठल्याही अधिकाऱ्याला मला अडचणीत आणायचे नाही. मात्र राजशिष्टाचाराचे पालन व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे. मात्र या नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर नाईलाजाने मला हक्कभंग समितीकडे जावे लागेल, असा इशारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.