Nanded Politics | माहूरात काँग्रेसला धक्का, महाविकास आघाडी फिसकटली, नांदेड महापालिकेत स्वबळाचे संकेत?
नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार आणि तीन आमदार असले तरीही नांदेड शहरात भाजपची फार ताकद नाही. नांदेड महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे
नांदेड | राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतही हीच आघाडी कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुका पाहता महाविकास आघाडी कितपत तग धरु शकेल, याची शाश्वती देत येत नाही. स्थानिक पातळीवर जो पक्ष बलशाली आहे, तोच आघाडीच्या विरोधात दिसतो. तरीही एकत्रितपणे भाजपविरोधात लढण्याचा प्रयत्न या तिन्ही पक्षांचा सुरु आहे. मात्र ऐनवेळी सत्तेची गणितं चुकतात. माहूरमध्ये (Mahur Nagar Panchayat) तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनंच महाविकास आघाडीला सुरुंग लावलेला दिसतोय. माहूर नगरपंचायतीत महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. याचे पडसाद आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीदेखील तसेच संकेत दिले आहेत.
नांदेड नगरपंचायतीत काय घडलं?
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नायगाव आणि माहूर या तीन ठिकाणी नगर पंचायत निवडणुका झाल्या. अर्धापूर आणि नायगाव येथे काँग्रेसला बहुमत मिळाले. माहूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जास्त मते मिळाली. इथे हे दोन पक्षा एकत्र येतील असे वाटत होते. मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारत शिवसेनेच्या नगरसेवकांना हाताशी घेतले आणि सत्ता स्थापन केली. यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून येथील काँग्रेसचे नेते संतप्त आहेत. आता कुठेच महाविकास आघाडी होणार नाही, असा बहुतांश कार्यकर्त्यांचा सूर आहे.
नांदेड महापालिकेची स्थिती काय?
नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार आणि तीन आमदार असले तरीही नांदेड शहरात भाजपची फार ताकद नाही. नांदेड महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. 81 पैकी 73 जागा काँग्रेसकडे आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, काँग्रेसने नांदेड शहरावर विकास डोळ्यासमोर ठेवून 800 ते 900 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. जनतेला सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असून महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे काँग्रेसचे संकेत आहेत.
पालकमंत्री अशोक चव्हाण काय म्हणतात?
नांदेड काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही. महापालिका निवडणुकीलाही अजून बराच अवकाश आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल.
इतर बातम्या-