कळीचा मुद्दा! महाविकास आघाडी आगामी काळात एकत्रित राहील का? जयंत पाटील म्हणतात….
महाविकास आघाडीची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांची एकत्रित अशी पहिली मोठी जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या सभेसाठी तीनही पक्षांचे लाखो कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून या सभेला ‘वज्रमूठ’ असं नाव देण्यात आलं आहे. पण मविआची हीच वज्रमूठ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या काळात जशीच्या तशी दिसेल का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आम्ही प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“महाविकास आघाडी पुढच्या काळात राहील का? हे प्रश्न आता अनावश्यक आहेत. कारण आम्ही एकत्रित येवून लोकांसमोर जातोय. या आमच्या कार्यक्रमानंतर आणि महाराष्ट्रात प्रत्येक विभागात होणाऱ्या विविध कार्यक्रमांनंतर मला खात्री आहे की, भाजपचा धीर खचल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
‘लोकांचं लक्ष विचिलित करण्यासाठी सावरकर गौरव यात्रा’
“मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्र बदललं आहे. मराठवाड्यात आज जे चित्र दिसेल ते महाराष्ट्रातील सगळ्या भागांची मानसिकता असेल. महाविकास आघाडीची वज्रमूठ म्हणून जी सभा होतेय त्यापासून मीडियाच्या माध्यमातून लोकांचं लक्ष विचलित व्हावं यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी दिला.
“भाजप आणि शिवसेनेला सवय आहे, ज्यावेळी विरोधी पक्ष एकसंघाने कार्यक्रम करतात त्यावेळी वेगळा उपक्रम राबवून मीडिया डायवर्ट करण्याचं काम ते प्रत्येक वेळेला करतात. आताही तेच काम असेल”, असं जयंत पाटील म्हणाले.
“मी स्थानिक कार्यकर्ते आणि इथल्या प्रतिष्ठित लोकांशी बोललो. सुरुवातीला जे दंगलखोर लोकं फिरली त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांना अजून अटक केली नाही. ज्या युवकांनी दंगल घडवण्यासाठी काम केलं त्यांना कुणाला अटक केली नाही आणि निष्पाप, ज्यांचा कुणाचा संबंध नाही अशा लोकांना अटक केली आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
“पोलिसांनी पहिल्यांदा स्वत:चं कर्तव्य बजावलं पाहिजे. जे सीसीटीव्हीत दंगल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पकडा. तेच खरे दंगल घडवणारे लोकं आहेत. दंगलीच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधायचं असेल तर घटनेच्या पहिल्या एक-दोन दिवसआधी जे मुलं स्कुटरवरुन फिरताना आणि काही आक्षेपार्ह करताना आढळली त्यांना आधी अटक केली पाहिजे”, असं जयंत पाटील म्हणाले.