Aurangabad | ज्या अशोक स्तंभाच्या मूर्तीवरुन देशभरात वाद उठलाय, तिचं औरंगाबाद कनेक्शन माहिती आहे का?
औरंगाबादचे सुनील देवरे यांनी देशाच्या संसदभवनातील हे नवं शिल्प साकारलं आहे. हा स्तंभ जयपूर येथे घडवण्यात आला असून त्याचं वजन तब्बल 9.5 टन एवढं आहे.
औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी नव्या संसद भवनाच्या छतावर स्थापन केलेल्या अशोक स्तंभ (Ashok Stambh) या राष्ट्रीय प्रतीकाचं अनावरण केलं. या प्रतीकावरील सिंह (Lion on Ashok stambh) अधिक आक्रमक आणि उग्र असल्याची टीका होऊ लागली आहे. या टिकेला भाजपच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिलं जातंय. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी मतं व्यक्त केली जात आहेत. संसद भवनामधील हा स्तंभ घडवणारे जागतिक दर्जाचे शिल्पकार हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. औरंगाबादचे सुनील देवरे यांनी देशाच्या संसदभवनातील हे नवं शिल्प साकारलं आहे. हा स्तंभ जयपूर येथे घडवण्यात आला असून त्याचं वजन तब्बल 9.5 टन एवढं आहे. स्तंभाच्या वजनावरूनच तो किती भव्य असेल याची कल्पना येते. हे नवे शिल्प अनेकांना आवडले असले तरी यावर टीका करणाऱ्यांची संख्याही तेवढीच आहे. सोशल मीडियावरून या नव्या स्तंभावरील सिंहांच्या रुपावरून प्रचंड टीका केली जातेय. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या टीकेला उत्तर दिलंय.
औरंगाबादच्या कलाकाराचे हात…
औरंगाबादचे भूमिपूत्र तथा जागतिक दर्जाचे शिल्पकार सुनील देवरे यांनी हे शिल्प साकराले आहे. 26 फूट उंच 11 फूट रूंद आणि 9500 किलो वजनाचा हा अशोक स्तंभ जयपूर येथे तयार झाला. मात्र दिल्लीतील नवीन संसद इमारत सेंट्रल व्हिस्टाच्या सातव्या मजल्यावर तो कसा न्यायचा, असा प्रश्न होता. एवढं वजन उचलणारी क्रेन उपलब्ध नसल्याने या स्तंभाच्या स्थापनेसाठी तब्बल दीड महिना लागला, असा अनुभव सुनील देवरे यांनी सांगितला.
स्ट्रक्चरल डिझायनिंग धनश्री काळेंचे
हा अशोकस्तंभ 26 फूट उंचीचा आणि 11 फूट रुंद करणे अपेक्षित होते. आतील बाजूचे स्ट्रक्चरल डिझायनिंग औरंगाबादच्याच धनश्री काळे यांनी केले. एवढ्या मोठ्या आकारच्या स्तंभासाठी आवश्यक असलेली कास्टिंगची सुविधा जयपूरलाच होती. त्यामुळे हे काम जयपूरला शिफ्ट करण्यात आले. अशोक स्तंभावरील तीन सिंहांच्या मुद्रा, आयाळ आणि इतर कलाकुसर करण्यात आली.
सोशल मीडियावर काय टीका?
संसद भवनातील नव्या अशोकस्तंभावरील सिंहाच्या नव्या अवतारावरून टीका केली जात आहे. सम्राट अशोकाच्या काळातील बोधचिन्हामधील सिंह हे शौर्याचं प्रतीक होतं. पण आता हे सिंह उग्र रुपातले असून ते रागाने गुरगुरत आहेत, असं वाटतं, अशी टीका केली जातेय.
भाजपचे उत्तर काय?
भाजपचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या टीकेला ट्विटरद्वारे उत्तर दिले. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असावे लागते. शांत आणि रागाच्या भावाबाबतही असंच काहीस आहे. तर मूर्तीकार सुनील देवरे यांनीही जुन्या आणि नव्या प्रतिकृतीत काहीच फरक नसल्याचं म्हटलं आहे.
टीका करायची की मोठेपण मान्य करायचं?
राजकीय विश्लेषक आणि ॲनलायझरचे संपादक सुशील कुलकर्णी यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान आणि भाजपचे विरोधक स्तंभावरील सिंहाच्या बदललेल्या रुपावरून टीका करत आहेत. मात्र ही मूर्ती घडवणारे हात कोणाचे आहेत आणि त्या मूर्तीकाराची पार्श्वभूमी काय आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सुशील कुलकर्णी यांनी लिहिलेली पोस्ट अशी-
‘ मोदी यांनी सेंट्रल विस्टा वर उभारलेली राजमुद्रा सिंहाची भावमुद्रा यावरून वादात टाकली जात आहे. या शिल्पाचे निर्माते मोदी आहेत. हे एक सत्य. या शिल्पाच्या मधील सिंहाचे भाव बदलले आहेत हे देखील जाणवते हे दुसरे सत्य आहे. आता काही अजून बाबी समोर येणे आवश्यक आहे. या शिल्पाचे ग्राफिक डिझाइन आणि निर्मिती करणारे कलावंत संभाजीनगर (Aurangabad) येथील आहेत. ते एम जीएम या संस्थेत काम करतात. त्या संस्थेचे पूर्ण नाव महात्मा गांधी मिशन असे आहे. ही संस्था नांदेड येथील माजी मंत्री कमल किशोर कदम यांची आहे. संभाजीनगर येथील शाखा त्यांचे बंधू अंकुशराव उर्फ बाबुराव कदम हे बघतात. कदम परिवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहे. त्यांच्या निष्ठा, प्रेम आणि संबंध शरद पवार यांच्याशी आहेत. याच संस्थेचे वर्तमान पत्र नेहमीच हिंदुत्व, मोदी यांच्या विरोधात गरळ ओकत असते. लोकपत्र नेहमीच असे वाद निर्माण करत आला आहे. आता शिल्प उभारल्या नंतर झालेले वाद पाहता शिल्पकार डिझायनर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेले संबंध विसरता येणार नाहीत. नरेंद्र मोदी यांनी व्यक्ती निवडून चूक केली की मनाचा मोठेपणा दाखवला? मोदीनी मन मोठे केले पण वाद होतील असे काही ठेवण्याचा कोतेपणा घडला आहे का? हे सगळे समोर आले पाहिजे….