मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झालीय का?; देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ विधानाने टेन्शन की दिलासा?
महाराष्ट्रात एक परंपरा आहे. एखाद्या सदस्याचं निधन होतं. तेव्हा सर्वजण सहकार्य करतात. ती निवडणूक बिनविरोध होते. याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं.
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दोन्ही नेत्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली आणि शाह यांनी या विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचंही सांगितलं गेलं. त्यामुळे अनेक मंत्रीपदाची आशा लावून असलेल्या अनेक आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या. परंतु, या विस्तारावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आमदारांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मीडियाशी संवाद साधला. अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही. परंतु, आम्ही योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चाच झाली नसल्याचं सांगून फडणवीस यांनी इच्छूक आमदारांचं टेन्शनच वाढवलं आहे.
मराठवाड्याकडे लक्ष
आचारसंहिता सुरु असल्यामुळे आम्हाला लिमिटेड अशी परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. आम्हाला जास्त चर्चा करता येणार नाही. बजेटच्या वेळी मराठवाड्यासाठी काय देता येईल याकडे लक्ष देऊ, असं फडणवीस यांनी सांगितलं.
माहिती घेऊन कारवाई करू
आमदार संतोष बांगर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर देणं टाळलं. मला आता त्याची माहिती नाही. माहिती घेऊन कारवाई करू, असं ते म्हणाले.
तपास सुरू आहे
पुण्यात झालेल्या तरुणांच्या हत्येवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या संदर्भात तपास सुरु आहे. तपास योग्य टप्प्यावर पोहोचला की योग्य माहिती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
लवकरच विस्तार
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
परंपरा जपली पाहिजे
यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिंचवड आणि कसबा या दोन विधानसभा पोटनिवडणुकांवरही भाष्य केलं. महाराष्ट्रात एक परंपरा आहे. एखाद्या सदस्याचं निधन होतं. तेव्हा सर्वजण सहकार्य करतात. ती निवडणूक बिनविरोध होते. याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं. मुंबईची निवडणकू बिनविरोध करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर आम्ही माघार घेतली. हीच परंपरा सर्वांनीच पाळली पाहिजे. जपली पाहिजे, असं ते म्हणाले.