संदिपान भूमरे विमानात बसून जेवण करतायत, फोटो का होतायत व्हायरल? मेन्यू काय आहे?

| Updated on: Mar 01, 2023 | 8:50 AM

औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा विमानातून प्रवास केला. या प्रवासाचे फोटो तुफान व्हायरल होतायत.

संदिपान भूमरे विमानात बसून जेवण करतायत, फोटो का होतायत व्हायरल? मेन्यू काय आहे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी नुकताच औरंगाबाद ते मुंबई असा एक प्रवास केला. तसे तर मंत्री असल्याने विमानप्रवास नित्याचाच आहे. मात्र संदिपान भुमरे यांचे या प्रवासाचे फोटो खूपच व्हायरल होतायत. भूमरे विमानात बसून जेवण करतानाचे हे फोटो आहेत. विशेष म्हणजे भूमरे काय जेवण करतायत, त्या मेन्यूवरून सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. भूमरे यांनी विमानात घरचा डबा आणलेला दिसतोय.

काय आहे मेन्यू?

औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा विमानातून प्रवास करत असताना विमानातच चटणी भाकरीचा आनंद घेतला आहे. विमानातील हायफाय जेवण आणि इतर पदार्थांना महत्व न देता त्यांनी घरून आणलेला चटणी भाकरीचा आस्वाद घेतला आहे. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मंत्रिपदावरची व्यक्तीही अत्यंत साधेपणाने चटणी भाकरीचा आनंद लुटताना पाहून अनेकांनी आश्चर्यकारक तसेच समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पैठणचे आमदार, खासदारकीची चर्चा

राज्यात वेगनान राजकीय घडामोडी घडत असताना सर्वाधिक मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या संभाजीनगरातही लोकसभा निवडणूकींची जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे जोरदार तयारीला लागले आहेत. तर भाजप-शिंदे युतीतून शिंदे गटाला तिकिट मिळण्याची आशा आहे. संदिपान भूमरे हे सध्या पैठणचे आमदार आहेत. औरंगाबादचे ज्येष्ठ म्हणून पालकमंत्री पदही त्यांना मिळालंय. आता पक्षाने संधी दिली तर खासदारीकीची निवडणूक लढवायची तयारी असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. मध्यंतरी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. २०१९ मध्ये औरंगाबाद आणि आताच्या संभाजीनगरातून एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती.

फाईव्हस्टार हॉटेल सोडून टपरीवर चहा नाश्ता

छत्रपती संभाजीनगरात नुकतच जी २० परिषदेच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी संपूर्ण संभाजीनगर चकाचक करण्यात आलं. पाहुण्याच्या पाहुणचारासाठी आलिशान सोय करण्यात आली. या पाहुण्यांसोबत यजमान म्हणून शहरातील, मराठवाड्यातील मंत्रीदेखील अशाच आलिशान हॉटेलमधील मेन्यूचा आस्वाद घेतील असं वाटत होतं. मात्र तिथेसुद्धा शहरातील मंत्र्यांनी अगदी साधेपणा दाखवला. शहरात आलेल्या जी 20 च्या पाहुण्यांचा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पाहुणचार केल्यानंतर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शहरातील एका छोट्या टपरीवर जाऊन चहा आणि नास्त्याचा आस्वाद घेतला. तिथले पालक वडे आणि मिसळ पाव वर येथेच्छ ताव मारला.