महाराष्ट्रात खरंच मध्यावधी निवडणुका लागणार? रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
"सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलंय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
औरंगाबाद : महाराष्टात साडेतीन महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं सरकार कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा वारंवार विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या या दाव्यावर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं सांगितलं जातंय. सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील लवकरच पार पडेल, असं सत्ताधारी मंत्री आणि आमदारांकडून सांगितलं जातंय. पण दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारबद्दल केलेल्या नव्या विधानामुळे अनेकांना आश्चर्यचा धक्का बसलाय. “सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही”, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलंय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
“महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा”, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.
कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील युवा उद्योजक मनोज पवार यांच्या विविध शेतीपूरक प्रकल्पाचा शुभारंभ व दिवाळी स्नेहमिलन तसेच कार्यकर्ता आढावा बैठक मंत्री दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पुढे बोलताना ते म्हणाले की, “पूर्वी राजा पोटातून जन्माला यायचा, आता मतपेटीतून राजा निवडला जातो. राजकारणात तुमच्या अंगात किती सोने असेल, पण तुमच्यासोबत लोक नसतील तर तुम्हाला काहीच किंमत नाही. यासाठी राजकारण करायचे असेल तर तुमच्यासोबत लोक असली पाहिजेत.”
“भाजपचे गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतरच शिवसेना-भाजप युतीत लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय भाजप राज्यात सरकार बनवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून महाविकास आघाडी केली”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
‘कामांवरील स्थगिती उठवायची असेल तर परत गुवाहाटीला जावे’
कन्नड शहरात निर्मिती महिला सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन मंत्री दानवे त्यांच्या हस्ते रविवारी झाले. या कार्यक्रमाला आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी राजपूत यांनी बोलताना सांगितले की, आपले सरकार आले आणि माझ्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली. इतरांची स्थगिती उठवली, तेवढी माझी स्थगिती उठवा, अशी मागणी मंत्री दानवे यांच्याकडे आमदार राजपूत यांनी केली.
आमदार राजपूत यांच्या मागणीला उत्तर देताना दानवे म्हणाले की, “आपण जर गुवाहाटीला गेला असता तर तालुक्यातील विकासकामांना स्थगिती मिळाली नसती. कन्नड तालुक्याच्या विकासकामांवरील स्थगिती उठवायची असेल तर तुम्हाला परत एकदा गुवाहाटीला जावे लागेल”, असा टोला मंत्री दानवे यांनी राजपूत यांना लगावला.