ग्रामपंचायतीत विधानसभेसारखा हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर सदस्यांची हॉटेलात बडदास्त; ठाकरे गटाला मोठं खिंडार?
आम्ही येत्या दोन दिवसात सरपंच आणि उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहोत. आमच्यावर अन्याय झाला आहे. सरपंच आणि उपसरपंच काहीच कामे करत नाहीत. विकास कामे होत नाहीत.
औरंगाबाद : ठाकरे गटाच्या निम्म्याहून अधिक म्हणजे 13 सदस्यांनी बंड केलं. या 13 सदस्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आधी हे सदस्य पिकनिकला गेले. पर्यटन झाल्यावर त्यांना एका हॉटेलात नजरकैदेत ठेवण्यात आलं. या हॉटेलात या सदस्यांची बडदास्त ठेवली जात आहे. कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू नये याची सर्व खबरदारी घेतली जात आहे. या सदस्यांचे फोनही स्विच्ड ऑफ येत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असून हातची सत्ता जाण्याची शक्यताही बळावली आहे… विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या हायव्होल्टेज ड्राम्यासारखंच हे चित्रं दिसत असलं तरी हा ड्रामा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा नाहीये. तर औरंगाबादमधील एका ग्रामपंचायतीमधील हा हायव्होल्टेज ड्रामा आहे. या ड्राम्यामुळे सध्या औरंगाबादमधील राजकारण ढवळून निघालं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील जोगेश्वरी ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या 17 आहे. या ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचे 13 सदस्य आहेत. या सदस्यांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. त्यांनी सरपंच आणि उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
फोन नॉट रिचेबल
जोगेश्वरी ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 50 हजार असून या पंचायतीत 13 हजार मतदार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पंचायतीतील 13 सदस्य नॉट रिचेबल होते. हे सदस्य पिकनिकला गेले होते. त्यानंतर ते औरंगाबादला परतले. मात्र, या सदस्यांना येथील भोंडवे पॅलेस हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची या हॉटेलात बडदास्त ठेवण्यात आली आहे.
त्यांचे फोन बंद असून त्यांना कुणालाही संपर्क करू दिला जात नसल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना सदस्यांच्या या बंडामागे भाजपच असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अविश्वास ठराव मांडणार
दरम्यान, आम्ही येत्या दोन दिवसात सरपंच आणि उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहोत. आमच्यावर अन्याय झाला आहे. सरपंच आणि उपसरपंच काहीच कामे करत नाहीत. विकास कामे होत नाहीत. विकासकामेच होत नसल्याने मतदार आमच्यावर नाराज आहेत. त्यामुळेच आम्ही अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असं एका सदस्याने सांगितलं.
दानवे, खैरे यांना दणका
राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी नेत्यांचं औरंगाबाद आणि जालन्यावर वर्चस्व आहे. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत बंड झाल्याने खळबळ उडाली आहे. सदस्यांचं हे बंड एकप्रकारे दानवे आणि खैरे यांच्यासाठी आव्हानच असल्याचं सांगितलं जात आहे.