Aurangabad Recruitment Scam | पुन्हा मोठा घोटाळा, औरंगाबादेत नियमांना डावलून नियुक्त्या, भरती प्रक्रियेत गोंधळ
औरंगाबादेत मृदा आणि जलसंधारण खात्यातील भरती प्रक्रियेदरम्यान तब्बल 85 पदांच्या भरतीदरम्यान नियमांना फाटा देण्यात आला आहे. येथे मुलाखती न घेता अपात्र आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : राज्यात मागील काही दिवसांपासून भरती परीक्षेतील वेगवेगळे घोटाळे (Recruitment Scam) समोर येत आहेत. या घोटाळ्यांमुळे सरकारी नोकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींच्या स्वप्नांना सुरुंग लागत असून सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, राज्यात आणखी एक भरती प्रक्रियेतील घोटाळा उघड झाला आहे. औरंगाबादेत (Aurangabad) मृदा आणि जलसंधारण खात्यातील तब्बल 85 पदांच्या भरतीदरम्यान नियमांना फाटा देण्यात आला आहे. येथे मुलाखती न घेता अपात्र आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकरी (Job) देण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.
85 पदांच्या भरतीमध्ये मोठा घोटाळा
मागील काही दिवसांपासून म्हाडा भरती परीक्षेतील गैरव्यवहार, टीईटी परीक्षेतील घोटाळा प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून अनेकांना अटक करण्यात आलं आहे. या घोटाळ्यात अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अजूनही पडदा पडलेला नाही. तोच आता औरंगाबादेत आणखी एक भरती प्रक्रियेतील घोटाळा समोर आला आहे. औरंगाबादेत मृदा व जलसंधारण विभागातील उपविभागीय अभियंता, जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता अशा 85 पदांच्या भरतीमध्ये मोठा घोटाळा करण्यात आला आहे. येथे पत्राता नसलेल्या उमेदवारांना मुलाखत न घेताच नोकरीवर घेण्यात आले आहे. आरोग्य खात्यातून नियुक्तीवर आलेल्या एका उपायुक्ताला मुलाखत न घेता, तो अपात्र असूनही नोकरीवर घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरकार, प्रशासन काय भूमिका घेणार ?
मृदा व जलसंधारण विभागात भरती प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. याच चौकशी समितीच्या अहवालात हा प्रकार उघड झाला आहे. तब्बल 85 जागांच्या भरतीदरम्यान हा गैरप्रकार झाल्यामुळे आता प्रशासन तसेच सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीईटी परीक्षा गैरव्यवहारात अनेकांना अटक
दरम्यान, पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या :