औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा झाला. विद्यापीठ परीक्षांच्या निकालात झालेल्या घोळावरुन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरुंच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन पोलीस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेरच ठिय्या मांडला आहे. (Ruckus between ABVP workers and Police at Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून अभाविप सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. विद्यापीठात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची आज बैठक सुरु होती. या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. तेव्हा कार्यकर्त्यांना रोखताना विद्यापीठाच्या गेटवरच पोलिसांसोबत मोठा राडा झाला.
विद्यार्थ्यांचे आरोप काय?
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांचे निकाल व्यवस्थित लागलेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले आहेत. काही विद्यार्थ्यांना आरआर दाखवून त्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. या घोळामुळे विद्यार्थी निकालापासून वंचित राहिले असून त्यांचं भवितव्य धोक्यात आले आहेत”अशी व्यथा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना मांडली.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी ‘गैरहजर’
“विद्यापीठ प्रशासनाकडे अभाविप अनेक दिवसांपासून मागणी करत आहे, या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. बरेच विद्यार्थी नापास झाले आहेत, परीक्षा देऊनही त्यांना गैरहजर दाखवण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने स्वार्थासाठी ऑनलाईन एजन्सीला टेंडर दिलं. मात्र चुकीच्या पद्धतीमुळे निकाल रखडले आहेत. प्रशासनाकडून ठोस लेखी उत्तर मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवणार” असा इशारा अभाविपने दिला.
संबंधित बातम्या :
लेखणी बंद आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका, राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
(Ruckus between ABVP workers and Police at Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad)