रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, कच्च्या मालाच्या आयातीत अडथळे, सळईचे भाव चारच दिवसात 5 हजारांनी महागले
रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे थेट आयात-निर्यातीवर परिणाम झाला असून कच्च्या मालाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यातच मागणीत वाढ आणि उत्पादनात कमी यामुळे सळईचा भाव वाढला असून यापुढेही ते वाढण्याची शक्यता आहे.
औरंगाबादः रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्धाचा परिणाम भारतीय स्टील उद्योगावर झाला असून जालन्यात त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. जालन्यात मोठ्या प्रमाणावत स्टील इंडस्ट्री (Jalna Steel Industry) आहे. मागील चार दिवसात बांधकामासाठी लागणाऱ्या सळईच्या (Iron Rods) भावात पाच हजारांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सळईचे भाव 54 ते 55 हजार रुपये प्रतिटन एवढे होते. तर शुक्रवारी हे भाव 59 हजारांवर पोहोचल्याचे दिसून आले. युक्रेन हा मँगनीज आणि लोहखनिजाचा मोठा निर्यातदार असून युद्धामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका भारतातील स्टील उद्योगांना बसला आहे. येत्या काळात कच्च्या मालाच्या मंदावलेल्या आयातीमुळे स्टील उद्योगात महागाई वाढू शकते, असे संकेत यातून मिळत आहेत.
कच्च्या मालासाठी परदेशावर अवलंबित्व
जालना येथील स्टील असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत कोळसा आणि भंगाराची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणावा लागतो. मात्र रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे मालवाहतूक सेवा विस्कळीत झाली असून कच्चा माल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या सळईचे भाव वाढले आहेत.
आयात-निर्यातीवर दरांचं गणित
जालना येथील भाग्यलक्ष्मी रि-रोलिंग मिलचे संचालक नितीन काबरा म्हणतात, मागणीप्रमाणे स्क्रॅपसह तत्सम कच्चा माल आयात करणे आणि उत्रादित सळई निर्यात करणे यानुसार, भाव ठरत असतात. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे थेट आयात-निर्यातीवर परिणाम झाला असून कच्च्या मालाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यातच मागणीत वाढ आणि उत्पादनात कमी यामुळे सळईचा भाव वाढला असून यापुढेही ते वाढण्याची शक्यता आहे.
युद्धामुळे आणखी कशाचे भाव वाढू शकतात?
भारतातील मेटलचा बहुतांश कच्चा माल रशिया आणि युक्रेनमधून येतो. एका अंगाजानुसार, युक्रेन अमेरिकेला 90 टक्के सेमीकंडक्टर ग्रेड निऑनचा पुरवठा करते. हेच 35 टक्के पॅलेडियम रशियाकडून अमेरिकेला पुरवले जाते. ही दोन्ही उत्पादने इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्टफोन, लॅपटॉपमध्ये चिपसेट निर्मितीसाठी वापरली जातात. त्यामुळे येत्या काळात ही उत्पादने महाग होऊ शकतात. अॅल्युमिनिअम काही दिवसांपूर्वी 290 ते 300 रुपये प्रति किलो होते. ते आदा दोन दिवसात वाढून 330 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आता हे भाव येत्या काही काळात वाढतील. रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांपासून बनणारी सर्व उत्पादने महागतील. फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिकचा दाणा, प्लास्टिक, पीयू , केमिकलचा जास्त वापर होतो. आतापासूनच ते महाग झाले आहे. काहींनी साठेबाजी सुरु केली आहे. त्यामुळे कच्चा माल पूर्वीप्रमाणे सहज मिळणे कठीण झाले आहे.
इतर बातम्या-