उद्याचा मुक्काम जेलमध्ये हे आदित्य ठाकरे यांना माहितीय … संजय शिरसाट यांचं मोठं विधान
ठाकरे गटाने उद्या मुंबई महापालिकेवर मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यापूर्वीच या मोर्चावर टीका होऊ लागली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या मोर्चावर टीका केली आहे.
औरंगाबाद : मुंबई महापालिकेत गेली 25 वर्षे ठाकरेंनीच भ्रष्टाचार केला. अन् तरीही आम्ही भ्रष्टाचार विरोधात हे म्हणायचं धाडस कसं होतं? आदित्य ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे मुंबईची अवस्था अशी का झाली? आपला उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार हे आदित्य ठाकरे यांना माहीत आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आदित्य असो किंवा कुणीही असो, असं मोठं विधान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. ठाकरे गटाच्या मोर्चाच्या आधीच शिरसाट यांनी हे विधान केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. आमच्या डेड बॉड्या येतील असं म्हणत धमकावलं गेलं. पण दिवसरात्र काम करून हे सरकार आम्ही चालवलं. ज्यांना वाटत होतं हे सरकार तीन महिन्यात जाईल ते लोक अजूनही बोंबा मारतील. पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. संजय राऊत यांना फसवणूक झाली वाटत असेल तर ते दुर्दैव आहे, असा संजय शिरसाट यांनी लगावला.
शिवसेनेच्या चिंध्या झाल्या
राष्ट्रवादी आपला पक्ष कधीही फोडू शकते याची प्रचिती आम्हाला आली होती. 2014 ला असाच प्रयोग झाला होता. राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी शपथ घेतली असती तरी राष्ट्रवादीला सत्तेत राहायचं होतं हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी जो सिक्सर मारला त्यामुळे शिवसेनेच्या चिंध्या झालेल्या आहेत, असं शिरसाट म्हणाले.
केंद्रात आमचेही मंत्री
पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. दिल्लीला जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे. कुणाला डच्चू देणे आणि कुणाला मंत्रिमंडळात घेणे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यावर मुख्यमंत्री बोलतील, असं सांगतानाच केंद्रात फेरबदलाचे संकेत आम्हालाही मिळाले आहेत. आमचेही मंत्री केंद्रात असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून टीका करत आहेत
शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका मुद्दाम करत आहेत. 17 – 18 विरोधी पक्षांचा गाडा आपण ओढतोय हे दाखवण्यासाठी शरद पवार टीका करत आहेत. समान नागरी कायद्यावरून मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आरोप करत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.