शिर्डी ते नागपूर 520 किमी अंतर, 12 तासांचा प्रवास साडेपाच तासांत, टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट
या महामार्गावरती तुम्ही जितक्या वेगाने धावण्याचा प्रयत्न कराल तितकीच त्याला बंधन सुद्धा आहेत.
औरंगाबाद : राज्याची राजधानी ते उपराजधानीला जोडणारा समृद्धी महामार्गाचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीचा आणि विकासाचा मार्ग दाखवणारा समृद्धी महामार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. अनेकांच्या मनात प्रश्न असतील की नक्की कसा आहे, हा समृद्धी महामार्ग टीव्ही 9 मराठीने हाच समृद्धी महामार्ग शिर्डीपासून नागपूर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
शिर्डीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या शिर्डी टोलनाक्यापासून समृद्धी महामार्गाच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. शिर्डीपासून नागपूरपर्यंत अंतर आहे 520 किलोमीटरचं. हे अंतर टीव्ही 9 ने फक्त साडेपाच तासात पूर्ण केले. यापूर्वी नागपूरकरांना शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी यायला किमान 12 तास लागायचे. मात्र नागपूरकर आता शिर्डीला फक्त पाच तासात पोहोचू शकणार आहेत.
प्रवासाला सुरुवात केल्यानंतर समृद्धी महामार्गाचे भले मोठे सहा लेनचे सिमेंट रस्ते समोर आले. हे सिमेंट रस्ते इतके स्मूथ गुळगळीत आणि उच्च दर्जाचे होते की या रस्त्यावरती आम्ही आमची गाडी तब्बल 140 किलोमीटर प्रति तास वेगाने पळवून पाहिले. तरीसुद्धा वेगाची परिणामकारकता जाणवत नव्हती, इतका हा सुंदर महामार्ग आहे.
मात्र या महामार्गावरती तुम्ही जितक्या वेगाने धावण्याचा प्रयत्न कराल तितकीच त्याला बंधन सुद्धा आहेत. समृद्धी महामार्गावर तीन लेन देण्यात आलेले आहेत. त्यातली डाव्या हाताची पहिली लेन ही जड वाहनांसाठी आहे. ज्यांना 80 किलोमीटर प्रती तासाचा वेग देण्यात आला आहे.
त्यानंतरची मध्यभागी असलेली दुसरी लेन आहे. ज्यावर ती कार धावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कारसाठी प्रती तास 120 किलोमीटर वेगाने बंधन ठेवण्यात आले. तर, तिसरी आणि शेवटची उजव्या हाताची रांग ही रांग फक्त ओव्हर टेकिंगसाठी ठेवण्यात आलेली आहे. तुमचं वाहन तुम्ही या रस्त्यावरून चालवत असताना समोरच्या वाहनापासून तुम्हाला किमान 200 मीटरचा अंतर ठेवणे बंधनकारक आहे.