औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसंवाद मोहिमेला सुरुवात, 15 दिवस जिल्हा पिंजून काढणार!
23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून यानिमित्त औरंगाबादेत शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
औरंगाबादः शहरातील निवडणुकांबाबत अनिश्चितता आहे, मात्र औरंगाबाद जिल्हा शिवसनेच्या वतीने स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने 15 जानेवारी ते 30 जानेवारीदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांमधील शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील तसेच येथील विकासकामांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली. या मोहिमेची सुरुवात आज गंगापूर तालुक्यातून झाली.
गंगापूर तालुक्यातून मोहिमेला प्रारंभ
औरंगाबाद शिवसेनेचे प्रवक्ते आणि जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शिवसंवाद मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येथील विकास कामांविषयी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या.
30 जानेवारीपर्यंत जिल्हाभर दौरे
23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून यानिमित्त औरंगाबादेत शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजपासून गंगापूरमधून या मोहिमेला प्रारंभ झाला असून उद्या 16 जानेवारी रोजी जानेफळ, 17 जानेवारी रोजी बोरगाव, त्यानंतर आडगाव, चिमनापूर, कन्नड शहर, वेरुळ तांडा, रत्नपूर शहर आदी गावांमध्ये हे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. 28 जानेवारी रोजी औरंगाबाद मध्य तर 30 जानेवारी रोजी औरंगाबाद पूर्व शहर या ठिकाणी बैठका होणार आहेत. या मोहिमेत सर्व शिवसैनिक महिला आघाडी, युवासेना इतरांनी कोरोना नियमांचे पालन करत उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार अंबादास दानवे, सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे आदींनी केले आहे.
इतर बातम्या-