Chandrakant Khaire | भागवत कराड यांना दिल्ली समजलीच नाही, त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, चंद्रकांत खैरे यांनी तोफ डागली
भागवत कराड यांना अजून दिल्ली समजलीच नाही. कराड यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. ते औरंगाबादेत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
औरंगाबाद : शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यावर तोफ डागली आहे. भागवत कराड यांना अजून दिल्ली समजलीच नाही. कराड यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. ते औरंगाबादेत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
भागवत कराड यांना कोणतेही अधिकार नाहीत
“भागवत कराड यांना आणखी दिल्ली कळलेलीच नाही. दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केलेलं आहे. भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कोणत्याही बँकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातलं आहे. ते काहीही करू शकत नाहीत,” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यावर केली आहे.
सत्तार यांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही
तसेच त्यांनी शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरदेखील टीकास्त्र डागलंय. देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असे सत्तार म्हणाले होते. त्यावर बोलताना “अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव संजय राऊत बोलू शकतात. रावसाहेब दानवे आणि सत्तार यांचे चांगले संबंध आहेत. मोदी आणि उद्धव ठाकरे हेच युतीबद्दल सांगू शकतात. मंत्री असताना असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे काम करत आहे,” अशा शब्दात त्यांनी सत्तार यांच्यावर टीका केला.
कराड, सत्तार काय उत्तर देणार ?
दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि भागवत कराड यांच्यातील राजकीय वैर लपून राहिलेले नाही. दोन्ही नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. यापूर्वीदेखील कराड यांच्यापेक्षा माझी उंची मोठी आहे, असे खैरे यांनी म्हटलेलं आहे. तसेच सत्तार आणि खैरे एकाच पक्षातील असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेला आहे. आता खैरे यांच्या वक्तव्यानंतर कराड आणि सत्तार हे दोन्ही नेते काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :
मुस्लिम जुमादिल-आखिर मासारंभ म्हणजे काय?, जाणून घ्या या महिन्याचं इस्लाममधील महत्त्व