Aurangabad | मावळ्यांमुळेच तुम्हाला दिल्लीचा योग, औरंगाबादवरून वज्रमूठ आवळणाऱ्या खा. जलील यांना अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर!
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून औरंगाबादेत मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीला विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून नामांतराच्या राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला.
औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावरून खा. इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित घेऊन जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद नामांतरावरून खा. जलील यांनी ही वज्रमूठच आवळली आहे. तर शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही खा. जलील यांना प्रत्युत्तर दिलंय. ”जलीलजी, छत्रपती संभाजी महाराजांच मावळयांमुळे आपल्याला दिल्ली बघण्याचा योग आला. आज आपण बोलत आहे त्या क्रूर औरंगजेबा बद्दल तर ज्याने स्वतःच्या वडिलाना मरेपर्यंत कारागृहात ठेवले अशांचा आदर्श घेता आपण आम्ही आपणास सुसंस्कृत समजायचो परंतु आपण शेवटी रूप दाखवले…”अशा शब्दात दानवे यांनी खा. जलील यांना प्रत्युत्तर दिलंय.
आमदार दानवे यांचं प्रत्युत्तर काय?
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र ठाकरे सरकारने औरंगाबादकरांना विचारात न घेता हा परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. खा. इम्तियाज जलील यांनीही या निर्णयाला तीव्र विरोध केला. त्याला उत्तर देण्यासाठी आमदार दानवे यांनी फेसबुक पोस्ट लिहिलीय. त्यात ते म्हणालेत, जलील जी छत्रपती संभाजी महाराजांच मावळयांमुळे आपल्याला दिल्ली बघण्याचा योग आला. आज आपण बोलत आहे त्या क्रूर औरंगजेबा बद्दल तर ज्याने स्वतःच्या वडिलाना मरेपर्यंत कारागृहात ठेवले अशांचा आदर्श घेता आपण आम्ही आपणास सुसंस्कृत समजायचो परंतु आपण शेवटी रूप दाखवले….संभाजीनगर तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी केले पण आपला ही कार्यकाळ संपुष्टात येईल माझ्या राजांचे आदर्श त्यांचे गुण संपूर्ण देश घेतो अश्या राजाचे नाव हे आमच्यासाठी अभिमानास्पदच!…
सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून औरंगाबादेत मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीला विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून नामांतराच्या राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला. आता पुढची लढाई कोर्टात आणि रस्त्यावर लढू, असा ठराव पारीत करण्यात आला. माझ्या जन्माच्या दाखल्यावर औरंगाबाद आहे तर मृत्यू प्रमाणपत्रावरही औरंगाबादच राहील. यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा इशाराही त्यांनी दिला. काल झालेल्या या बैठकीला इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख, माजी महापौर रशीद मामू, माजी नगरसेवक अफसर खान, एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी, जनता दलाचे अजमल खान, काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले, योगेश बन, रिपब्लिकनचे किशोर थोरात, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, पवन डोंगरे, फेरोज खान, एजाज झैदी, किशोर थोरात आदींची उपस्थिती होती.