Sandipan Bhumare | मी कधीही लोटांगण घातलं नाही, संदिपान भूमरेंचं प्रत्युत्तर, राऊतांना जनतेतून निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान!
नेत्यांनी टीका केली पाहिजे. पण कोणत्या पातळीवर केली पाहिजे, याला मर्यादा आहे. आम्हीही तीन-चार लाख मतांतून आलेलो आहेत .त्यांच्यासारखे आयते आलेले नाहीत, असं प्रत्युत्तर संदिपान भूमरेंनी दिलं.
औरंगाबादः विधानसभा निवणडुकीनंतर 2019 मध्ये आघाडी झाली तेव्हा संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) माझ्यासमोर लोटांगण घालत आले होते. सामानाच्या कार्यालयातलं हे दृश्य आजही मला आठवतं. असं वक्तव्य संजय राऊत (sanjay Raut) यांनी केलंय. मात्र शिवसेना आमदार (Shivsena MLA) संदिपान भूमरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मी कधीही कुणासमोर लोटांगण घातलेलं नाही. निवडणूक जिंकून आलो तेव्हा राऊतांना भेटायला गेलो होतो, मात्र लोटांगण वगैरे घालणार नाही, असं स्पष्टीकरण यांनी दिलं. औरंगाबादमध्ये टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. तसेच आमच्यावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जनतेतून निवडून दाखवावं, असं आव्हानही संदिपान भूमरे यांनी दिलंय..
संदिपान भूमरे काय म्हणाले?
संजय राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देताना संदिपान भूमरे म्हणाले, ‘ जेव्हा मी निवडून आलो. मंत्री झालो. तेव्हा त्यांना भेटायला गेलो. तेथे जाऊन फक्त आभार मानले. लोटांगण घातलं नाही. मी एक कार्यकर्ता आहे,, ३५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलंय. त्याची पावती मिळाली असावी कदाचित. त्यांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नका. लोकांनाही संजय राऊतांचं बोलणं ऐकून कंटाळ आलाय…
‘संजय राऊांनी जनतेतून निवडून यावं..’
संजय राऊत यांच्यावर टीका करताना संदिपान भूमरे म्हणाले, ‘ नेत्यांनी टीका केली पाहिजे. पण कोणत्या पातळीवर केली पाहिजे, याला मर्यादा आहे. आम्हीही तीन-चार लाख मतांतून आलेलो आहेत .त्यांच्यासारखे आयते आलेले नाहीत. राऊतांनी राजीनामा द्यावा आणि जनमतातून निवडून यावं, तर मी त्यांना मानतो… असं आव्हान भूमरेंनी दिलंय..
संजय राऊतांचं वक्तव्य काय?
संजय राऊत यांनी आज बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हटले की, ‘ जुन्या सहकाऱ्यांना आवाहन आहे. गोंधळू नका. तुमची मानसिक आवस्था मला माहिती आहे. संजय राठोड आदल्या दिवसापर्यंत माझ्याबरोबर होते. संदिपान भूमरे आमदार झाले तेव्हा सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घालत होते. माझ्याकडे व्हिडिओ आहे. मग आताच यांना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून संशय का यावा? असा सवाल संजय राऊतांनी केला. बंडखोर आमदार प्रत्येक वेळी बंडामागील कारण वेगवेगळं सांगत आहे. कुणी अनैसर्गिक आघाडीवरून तर कुणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी मिळाला नाही म्हणून नाराज आहे. कुणी संजय राऊतांमुळे बाहेर पडल्याचा आरोप करतंय, यावरून संजय राऊतांनी बंडखोरांना सल्ला दिला. तुम्ही एकदा बसून नक्की कारण ठरवा, असं संजय राऊत म्हणाले.