औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे. असा घणाघात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. ओवैसी आणि जलील हे हैदराबादचे पार्सल आहे. म्हणूनच ते औरंगजेबाचा फोटो दाखवतात, असा घणाघात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला. तर, सामाजिक एकता बिघडवणाऱ्या एमआयएमवर काय कारवाई करणार असा सवाल सूरज चव्हाण यांनी राज्य सरकारला केला. संजय शिरसाट म्हणाले, एमआयएमनं आंदोलन केलं. तेव्हा त्यांनी औरंगजेबादचे फोटो दाखवलेत. ही निजामांची औलाद आहे. ओवैसी किंवा जलील हे सगळं हैदराबादचं पार्सल आहे. त्यामुळे त्यांना या शहरात त्यांचे वंशज ठेवायचे आहेत. म्हणून औरंगजेबाचा फोटो पहिल्यांदा या शहरात झळकला. साखळी उपोषण केलं. पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. ती त्यांनी केली नाही. आम्ही या गोष्टीला सहन करणार नाही. संभाजीनगरची जनता सहन करणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.
सामाजिक एकता बिघडेल, अशा पद्धतीचं कृत्य करूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई भाजपकडून केली जात नाही. याचा अर्थ अशा कृत्याला भाजपचा पाठिंबा आहे का, याचा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावा, अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केली. ओवैसींनी असं वक्तव्य केलं होतं की, माझ्या गळ्यावर सुरा ठेवला तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही. राज्यातील सामाजिक एकता बिघडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एमआयएमची मिलीभगत आहे, असा सवालही सुरज चव्हाण यांनी विचारला.
मी इथे राजकारणी किंवा पार्टीचा नेता म्हणून आलेलो नाही, तर औरंगाबादी म्हणून आलेलो आहे. हे शहर औरंगाबाद आहे. राहील आणि होतं. आमचं हे आंदोलन अनेक दिवस सुरू राहणार आहे. मी औरंगाबाद नाव हे आंदोलन ठिकाणी लावलं आहे. हेच नाव कायम वापरत राहीन. आंदोलन सुरू झालं आहे. आंदोलन शांततेत पार पाडा. मला मान खाली घालायला भाग पाडू नका, असं आवाहन काल इम्तियाज जलील यांनी केलं होतं. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चला. अशी कोणतीही घोषणा देऊ नका वाद निर्माण होईल. लोकशाही नियमाने आपण याचा विरोध करणार आहोत. मला लोक म्हणतात काहीही करा. पण औरंगाबाद औरंगाबाद राहू द्या. त्यासाठी हे आंदोलन असल्याचंही जलील यांनी म्हंटलं होतं.