नांदेड : अजित पवार यांच्या रूपाने नको असणारी सासू आता शिंदे गटांच्या वाट्याला आलीय. त्यामुळे राष्ट्रवादीमुळे हिंदुत्व धोक्यात आले असे म्हणत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटांनी राजकीय नीतीमत्ता गमावलीय का, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर केंद्रातील भाजपा देवेंद्र फडवणीस यांना साईडलाईन करतेय का अशीही शंका अंधारे यांनी उपस्थित केलीय. सुषमा अंधारे ह्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित पवार यांचे अभिनंदन. दादांची प्रशासनावर चांगली पकड आहे. अर्थ आणि नियोजनाची त्यांना चांगली जाण आहे. यापूर्वीही ही खाती त्यांनी हाताळली आहेत. दादांसारख्या अनुभवी व्यक्तीकडे ही खाती गेलीत. ही आनंददायी बाब आहे.
या निमीत्ताने राजकीय नैतिकता हरवली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण आमच्याकडून ४० चुकार भावंड गेलीत. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने आमचं हिंदुत्व धोक्यात येतं, असं ते म्हणाले होते. आता यांनी आपलं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं असेल, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
दादांबद्दल तक्रारी करून ही माणसं बाहेर पडली होती. जी सासू नको नको म्हटलं तीच सासू वाट्याला आली. आता सगळ्या सुनांची काय चलविचल असेल. हा औत्सुक्याचा विषय आहे. ही सगळी माणसं राजकीय नैतीकता हरवलेली माणस आहेत. नैतिकतेचा कुठलाही आधार यांच्याकडे नाही. सत्तेसाठी कुठलीही तडजोड ही लोकं करू शकतात, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
अर्थखात हे सर्वात महत्त्वाचं खात असतं. या खात्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री हे दोनच लोकं हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. यापूर्वीही कुठलीही घडामोड असली की, देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन जात होते. यावेळी अजित पवार स्वतः गेले. याचा अर्थ असा आहे की, केंद्रातील भाजप देवेंद्र फडणवीस यांना साईडलाईन करत आहे. फडणवीस यांच्या नकारात्मकतेची कीर्ती केंद्रापर्यंत पोहचलेली दिसते, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.