औरंगाबाद: राज्य सरकारच्या सूचनांनुसार औरंगाबादेत महापालिकेने (Aurangabad Municipal corporation) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Corona Vaccination) मोहीम चांगलीच विस्तारली आहे. याअंतर्गत आता उच्च न्यायालय, पोस्ट कार्यालय, रेडक्रॉस, विमानतळ, रेल्वेस्टेशन या ठिकाणीही लसीकरण सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी (Dr. Paras Mandlecha) दिली.
नवरात्रीदरम्यान शहरातील प्रमुख कर्णपुरा आणि दुर्गा माता मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने या दोन प्रमुख मंदिरांमध्येही लसीकरणाचे केंद्र स्थापन केले आहे. तसेच या दोन ठिकाणी लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या भाविकांची कोरोना चाचणीदेखील केली जात आहे. मंदिरांमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाला भाविकांचाही भरगोस प्रतिसाद मिळत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाला गती मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने मिशन कवच कुंडल ही मोहीम 8 ते 14 ऑक्टोबरपर्यत राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेने नियोजन केले आहे. त्यानुसार 21 खासगी रुग्णालयात मोफत लसीकरण सुरू केले आहे. तसेच शहरातील प्रमुख देवीच्या मंदिरासमोर देखील कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवसात खासगी रुग्णालयात 1848 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी 68 केंद्र सुरू असून या केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. तसेच आता उच्च न्यायालय, रेडक्रॉस, पोस्ट ऑफीस, विमानतळ, रेल्वेस्टेशन या ठिकाणी देखील लसीकरण सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी स्पष्ट केले.
कोविड लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी मिशन करण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. गर्दीच्या व विविध ठिकाणी लसीकरणासंबंधी जनजागृती करणारी शिबिरे घेण्यात येत आहेत. कॉलनीतून कचरा गोळा करत फिरणाऱ्या घंटागाडीवरही मिशन कवच कुंडल ध्वनिफीत ऐकण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच धर्मगुरूंनीदेखील सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या-