औरंगाबादः राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील कोरोना (Aurangabad corona) रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी लोकांच्या उपस्थितीबाबत अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे शहर (Aurangabad city) तसेच ग्रामीण भागातील हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृहे तसेच लग्न सोहळ्यातील उपस्थितांच्या संख्येवरील सर्व निर्बंध हटवावेत, असा अहवाल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. तसेच जिल्ह्यातील बैलगाडी शर्तींनाही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मागील महिन्यात खुलताबादच्या अर्जावर निर्णय झाला नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांसह बैलगाडी शर्यतींना आता परवानगी देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे केवळ 10 रुग्ण आढळले. शहरात 8 तर ग्रामीण भागात 2 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 65 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोना रुग्णांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून मराठवाड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हळू हळू निर्बंध कमी केले जात आहेत.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाळूज, जरंडी येथील कोविड केअर सेंटरही लवकरच बंद करणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे 8 लाख नागरिकांचा अजूनही कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेमे बाकी आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यासाठी शहरात 70 खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून 70 वॉर्डांत लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डात एक खासगी डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून या वॉर्डातील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सोमवारी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे नोंदवली गेली.
औरंगाबाद- 10
जालना- 01
परभणी- 10
नांदेड- 03
हिंगोली- 00
बीड- 00
लातूर- 10
उस्मानाबाद- 01
इतर बातम्या-