औरंगाबादः गेल्या काही दिवसापासून शेतकरी वेगवेगळ्या संकटामुळे मेटाकुटीला आलेला असतानाच आज औरंगाबादसह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार आहे. आज दिवसभर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती, त्यातच रात्री आठ वाजल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, दहेगाव, शेंदूरवाडा तर पैठणमधील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी, वाळूज या परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दौलताबाद परिसरातही रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने अनेक परिसराती शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम तर अनेक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे तर त्याच वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
सध्या औरंगाबाद जिल्ह्यासह अनेक ठिकाणी रब्बीचा हंगामा सुरू आहे. त्यातच पाऊत सुरु झाल्याने रब्बी हंगामाला जोराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऐन रब्बीच्या हंगामामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकांसह जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी नागरिकांचेही नुकसान झाले आहे. रब्बी हंगामामध्ये पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाचे संकट तर कधी बाजारभावाचे संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आज अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.