Vaccination: औरंगाबादेत आता पेट्रोल पंपावर लस मिळणार, जिल्ह्यात लसीकरणात 10 टक्क्यांची वाढ
कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेत आजपासून शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
औरंगाबादः शहरातील पेट्रोल पंपांवर आता नागरिकांसाठी लसीकरणाची (Vaccination) सोय सुरु करण्यात आली आहे. देशातील लसीकरण मोहिमेत औरंगाबाद जिल्हा पिछाडीवर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) लसीकरणासाठी अधिक आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत लस न घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोलपंपावर पेट्रोल न देण्याच्या आदेश देण्यात आले होते. लस प्रमाणपत्र तपासल्याशिवाय पेट्रोल देणाऱ्या पंपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईदेखील सुरु होती. मात्र पेट्रोलपंपांवरच लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी पेट्रोल पंप असोसिएशनतर्फे अनेक दिवसांपासून केली जात आहे. आता ती मान्य करण्यात आली आहे.
सर्व पेट्रोलपंपांवर लसीकरण
शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे पुरवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपांवर आलेल्या नागरिकांकडे आधी लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे की नाही, हे तपासले जात आहे. प्रमाणपत्र नसल्यास आणि लस घेतलेलीच नसल्यास अशा नागरिकांना सविस्तर चौकशी करून लसीचा डोस दिला जात आहे.
पेट्रोल पंप 24 तास सुरूच राहणार
दरम्यान, लस प्रमाणपत्र तपासण्यासाठी पेट्रोलपंपांवर अधिक मनुष्यबळ लागत असल्यामुळे शहरातील पेट्रोलपंप सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरु राहतील, असा निर्णय पेट्रोलपंप असोसिएशनने घेतला होता. मात्र पंपांची ही मागणीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. पेट्रोलपंप नेहमीप्रमाणे सुरुच राहतील, असेही त्यांनी सांगितले.
लसीकरणात 10 टक्के वाढ
जिल्ह्यात लस प्रमाणपत्र असेल तरच गॅस, पेट्रोल, रेशन, किराणा, मद्य मिळेल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर आता लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होत आहे. शहरातदेखील लस नाही तर प्रवास नाही, कार्यालयात प्रवेश नाही, असा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला. तसेच शहरात हर घर दस्तक मोहिमदेखील राबवली जात आहे.
इतर बातम्या-