औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad) एक आगळावेगळा विवाह सोहळा (marriage ceremony) झालाय. औरंगाबादची सांची रगडे इंग्लंडच्या एका मुलाच्या प्रेमात पडली. दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले. अगदी भारतीय पद्धतीनं हा विवाह सोहळा गुरुवारी पार पडला. भारतीय गाण्यावर थिरकणारं इंग्लंडचं क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करून लग्नातही सगळी मंडळी सहभागी झाली. त्याला कारणही म्हणजे लग्न आहे यांच्या घरच्या एकुलत्या एक मुलाचं म्हणजे एडवर्ड्च. औरंगाबादच्या सांची नावाच्या एका मुलीच्या प्रेमात एडवर्ड पडला. 2019 पासून इंग्लंडमध्ये हे दोघे सोबत होते. 3 वर्षांनी घरी त्यांनी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला.
मात्र अट एकच होती की लग्न भारतात म्हणजे औरंगाबादेत व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धतीने. एकुलता एक मुलगा असल्याने एडवर्डच्या कुटुंबाने होकार दिला. थेट कुटुंबासह त्यांनी औरंगाबाद गाठलं आणि याच लग्नाची वरात निघाली.
एडवर्डच कुटुंबीय आणि रगडे कुटुंबीय एकत्र ताल धरून नाचले. नंतर बौद्ध पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यावेळी एडवर्डसह त्याच्या कुटुंबीयांनीसुद्धा सर्व विधीत सहभाग घेतला. यानंतर वधू-वर दोघांनीही लग्नाचा आनंद व्यक्त केला.
ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एका तासाचे काम असते. मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांची विधी असते. हे सगळं आनंददायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिलीय. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न होत असल्याने आनंद होत असल्याचं सांगितलं.
जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंद असल्याचं मुलीचे वडील राजेश रगडे यांनी सांगितलंय. औरंगाबादची सांची आता कायमची सातासमुद्र पार राहायला जाणार याचं दुःख आहे.
मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबीयांनी दिली. या लग्नामुळे ब्रिटिश कुटुंबाची आणि एका भारतीय कुटुंबाची नाळ भारतीय पद्धतीने यावेळेस घट्ट जोडल्या गेली हे मात्र निश्चित.