या मंत्र्याच्या फोटोमुळं आनंदाचा शिधा उशिरा मिळाल्याचा विरोधकांचा आरोप
विरोधकांच्या मतानुसार शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यामुळं हा शिधा उशिरा पोहचला.
औरंगाबाद : संदीपान भु्मरे हे आनंदाच्या शिधा पाकिटावर फोटो छापणारे पहिले मंत्री ठरलेत. मात्र, त्यांच्या या फोटो छपाईच्या कामामुळं पैठणवासीयांना चार दिवस उशिरानं शिधा मिळाल्याचा आरोप होतोय. दिवाळीनिमित्त सरकारनं वाटलेला आनंदाचा शिधा उशिरानं पोहचल्याचा आरोप झाला. अचानक इतकी मोठी आर्डर तयार करून पोहचविण्यासाठी विलंब सहाजिक आहे. मात्र, औरंगाबादच्या पैठणमध्ये या शिध्याची पाकीटं तयार असूनही चार दिवस उशिरानं मिळाली. या विलंबाचं कारणही वेगळं आहे.
विरोधकांच्या मतानुसार शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यामुळं हा शिधा उशिरा पोहचला. यामागचं कारण आहे या शिधाच्या पाकिटावर दिसणारा संदीपान भुमरे यांचा फोटा. संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधावर स्वतःचे फोटो छापले. त्यामुळं सामान्य लोकांना पैठणमध्ये शिधा उशिरा मिळाल्याचा आरोप होतोय.
फोटो छापून होईपर्यंत शिधा न वाटण्याचे आदेश मंत्री संदीपान भुमरे यांनी वितरकांना दिले होते. त्यातच चार दिवस गेल्याचा दावा केला जातोय. महाराष्ट्र सरकारनं दिवाळीनिमित्त दिलेल्या या शिधावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. या तिन्ही नेत्यांच्या फोटोखाली महाराष्ट्र शासनाचं चिन्ह आहे. त्याच्या दोन्ही बाजूला एक रिकामी जागा होती. त्याच रिकाम्या जागेवर मंत्री संदीपान भुमरे यांनी स्वतःचा फोटो छापला.
तीन फोटोंएवजी चौथा फोटो म्हणजे संदीपान भुमरे यांचा आहे. आनंदाच्या शिधा येथे फोटो छापणारे संदीपान भुमरे हे एकमेव मंत्री आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यावर स्वतःचा फोटो छापलेला नाही.
सामान्य लोकांची दिवाळी गोड जावी म्हणून राज्य सरकारनं शिधा देण्याचं ठरविलं. त्याला आनंदाचा शिधा असं नाव देण्यात आलं. शंभर रुपये देऊन लोकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो गोडतेल, एक किलो चणाडाळ अशा चार वस्तू मिळत आहेत.