औरंगाबाद : सचिन वाझे हा शिवसेनेचा माणूस आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मित्र आहेत. मग सचिन वाझेंनी अँटालिया खाली गाडी का ठेवली, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विचारला. हे प्रकरण दुसऱ्याच मुद्द्यावर भरकटत जाईल, हे मी आधीच सांगितलं होतं, असही राज ठाकरे म्हणाले. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी केवळ निवडणुकीसाठी बाहेर पडलो नाही. निवडणुका येताच आणि जातात. संभाजी नगरची निवडणूक आणखी समोर आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांशी बोललो नव्हतो. म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी औरंगाबादला आलो आहे.
मनसेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत घेण्यात आली. रणनिती मी तुम्हाला कशी सांगणार. तुम्हाला सांगण्याइतपत काही ठरलं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. संभाजी नगरच्या निवडणुका सहा आठ महिने पुढे जातील, असं चित्रं आहेत. त्यासाठी ओबीसीचे प्रकरण सुरू केलंय. केंद्राने मोजायचे की राज्याने मोजायचे यावरून मोजामोजी सुरू झाली आहे. कोणी सामोरे जायला तयार नाही. आमच्याकडे मते मागायला येऊ नका, अशा पाट्या ओबीसींनी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळं ओबीसींना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.
पाच लाख उद्योजक देश सोडून गेले. त्याची आपण चिंता करत नाही. त्यामुळं लाखो नोकऱ्या गेल्या. रोजगारचे प्रश्न सोडून आपण, आर्यन खानवर फोकस करतो. आर्यनवर २८ दिवस रोज बातम्या चालवितो. त्याऐवजी महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडं आपण लक्ष दिलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.