ना NEET, ना जागांची मारामार, स्वस्त अन् मस्त! म्हणून तर हजारो भारतीयांना युक्रेनच्या MBBS ची भुरळ!
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांचा हा प्रवाह समोर आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी MBBS च्या युक्रेन पॅटर्नचा अभ्यास करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
औरंगाबादः रशिया आणि युक्रेन युद्धाची (Russia-Ukraine War) आग अधिकच पेटताना दिसतेय, त्यामुळे तेथे अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्याचे केंद्र सरकारचे (Indian Government) शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. यातील बहुतांश भारतीय नागरिक हे युक्रेनमध्ये MBBS शिकण्यासाठी गेलेले विद्यार्थी आहेत. एका अहवालानुसार, युक्रेनमध्ये एमबीबीएस करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 20 हजारांच्या घरात आहे. यामुळे युक्रेनमध्ये गेलेले हजारो विद्यार्थी MBBS करण्यासाठीच तेथे का गेलेत हा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आणि भारतातल्या शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरु झाली. या निमित्ताने युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण (Ukraine MBBS) आणि भारतातील वैद्यकीय शिक्षण याची तुलना झाली. प्रवेश प्रक्रियेपासून जागांची संख्या, शिक्षण पद्धती, डिग्रीचा दर्जा या सर्वांवर चर्चा घडू लागल्या. त्यातून काही तथ्य समोर आले आणि विद्यार्थ्यांना युक्रेनचे MBBS भारतापेक्षा अधिक सोपे का वाटते, याची उत्तरं मिळाली.
प्रवेशासाठी NEET ची झंझटच नाही…
भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी NEET द्यावी लागते. अखंड मेहनतीची तयारी, जिद्द, चिकाटी हे गुण असतील तरच NEET सारखी परीक्षा विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतात. वर्ष-वर्ष घासल्यानंतरही अनेकांना समाधानकारक गुण मिळत नाही. रिपीटर्स विद्यार्थ्यांनाच NEET मध्ये चांगले गुण मिळतात, असं म्हटलं जातं. अर्थात यात पहिल्या प्रयत्नात सहजपणे पार करणाऱ्यांचे अपवाद असतात. त्यानंतरही सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची स्पर्धा सुरु होते. मात्र युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना NEET देण्याची गरज नाही..
जागांची मारामारही नाही…
भारतात दरवर्षी फक्त 84 हजार एवढ्याच जागांवर वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 7 ते 8 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. ज्यांचा नंबर लागत नाही, त्यांची स्वप्न अपूर्ण राहतात, काही नव्याने NEET च्या अभ्यासाला लागतात तर काहीजण युक्रेनसारख्या देशांची वाट धरतात.
स्वस्तात MBBS ची डिग्री
भारतात खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय पदवी शिक्षणाचा 6 वर्षांचा खर्च 60 लाख ते 1.1 कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र युक्रेनमध्ये 15 ते 25 लाखांत सहा वर्षांची MBBS ची डिग्री मिळते.
युक्रेनच्या कोर्सला जागतिक मान्यता
भारताच्या वैद्यकीय पदवीला जागतिक मान्यता नाही. मात्र युक्रेनमध्ये असलेल्या 33 वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवीला वर्ल्ड हेल्थ कौंसिलची मान्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतासह जगात कुठेही प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी आहे.
MBBS करिता कोणत्या देशात किती खर्च?
युक्रेन- 20 लाख कझाकिस्तान- 25 लाख भारत- 1 कोटी ब्रिटन- 4 कोटी कॅनडा- 4 कोटी न्यूझीलंड- 4 कोटी ऑस्ट्रेलिया- 4 कोटी अमेरिका- 8 कोटी
MBBS च्या युक्रेन पॅटर्नचा अभ्यास करणार
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांचा हा प्रवाह समोर आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी MBBS च्या युक्रेन पॅटर्नचा अभ्यास करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच भारतातील शुल्करचनेच्या कायद्यात बदल करता येत नसला तरीही शिक्षण पद्धतीत काय बदल करता येतील, त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.
इतर बातम्या-