औरंगजेब भाजपचा कोण लागतो? उद्धव ठाकरेंचा सवाल
औरंगजेबाच्या कबरीच्या हटाव्याच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर हटवण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात यावरून हिंसाचार झाला. उद्धव ठाकरे यांनी यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. त्यातच काल संध्याकाळी औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यावरुन वातावरण तापले आणि मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता नुकतंच यावरुन ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकतंच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांना औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कबर उखडण्यामागे असमर्थता दाखवली. त्याला केंद्राचे सरंक्षण आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग तो औरंगजेब तुमचा कोण लागतो, असा प्रश्न मला भाजपला आणि केंद्र सरकारला विचारायचा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“तो औरंगजेब तुमचा कोण लागतो?”
“गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करुन, बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज स्थापन केले होते. त्या स्वराज्यावर महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता. औरंगजेब हा महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता, पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही. पण महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे अशा औरंगजेबाचे थडगं उचलण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार नुसत्या वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामागे असमर्थता दाखवली आहे. त्याला केंद्राचे सरंक्षण आहे. म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला सरंक्षण देणार असेल तर मग तो औरंगजेब तुमचा कोण लागतो, असा प्रश्न मला भाजपला आणि केंद्र सरकारला विचारायचा आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावा”
“औरंगजेब, अफजलखान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना नष्ट करायचे असं वाटत असेल तर तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना सांगा की ज्या औरंगजेबाला मूठमाती दिली, त्या औरंगजेबाच्या कबरीला तुम्ही उद्धवस्त करा. हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावा”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.