विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचे सत्तास्थापनेबद्दल विधान, अपक्ष आमदारांबद्दल केला मोठा दावा
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर आले. टीव्ही 9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान नुकतंच पार पडले. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर आले. टीव्ही 9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर इतर आणि अपक्ष यांना 13 ते 23 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठा दावा केला आहे. “महाराष्ट्रात आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
“आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”
बच्चू कडू यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी “प्रहार जनशक्ती पक्षाचे १५ आमदार निवडून येणार आहे. त्यासोबतच अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
“आम्हीच सत्ता स्थापन करणार”
“माझ्या मतदारसंघात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केले आहे. काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात आहे. मात्र माझा विजय हा निश्चित होणार आहे. राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहे, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. आम्ही सत्ता स्थापन करु आणि एखाद्या मोठया पक्षाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
“आमचे 15 आमदार निवडून येणार”
“आमचे 15 आमदार निवडून येणार आहेत. अनेक अपक्ष आमदारांच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्ही अपक्ष आमदारांची मोठं बांधणी करु. आम्ही कोणाला सोबत घ्यायचं ते आता आम्ही ठरवणार आहे. आम्ही कुणासोबत जाणार हे मोठे पक्ष ठरवू शकत नाही. राज्यातील सरकार अपक्ष आणि लहान पक्ष चालवणार आहे. सरकार आमचं असेल. मोठे पक्ष पाठिंबा देतील. आता मोठ्या पक्षासाठी आमचा फोन नॉट रीचेबल राहील”, असे बच्चू कडूंनी म्हटले.