मुंबई : आमदार बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल (Cabinet Expansion) मोठी विधानं केली आहेत. पहिलं म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे सरकारमध्ये अस्थिरता आहे. आणि दुसरं म्हणजे धनुष्यबाणाचा वाद कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय. शिवसेनेच्या (Shiv Sena) चिन्हाचा फैसला झाल्यास दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं विधान आमदार बच्चू कडूंनी केलंय. याशिवाय कायदेशीर बाबींमुळेच सध्याचं सरकार अस्थिर असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलंय. सरकार घटनात्मक नसल्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याचा आरोप याआधी खासदार संजय राऊतांनी केला होता. त्यावेळी शिंदे गटानं ते आरोप फेटाळून लावले. मात्र धनुष्यबाणाचा निर्णय न्यायप्रक्रियेत असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं खुद्द बच्चू कडू म्हणाले आहेत.
राज्यात सरकार बदलून जवळपास 8 महिने लोटले आहेत. मात्र अजूनही दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या फक्तच चर्चा झडतायत. सर्वसाधारण स्थितीत महाराष्ट्र सरकार हे एकूण 43 मंत्र्यांद्वारे चालवलं जातं. पण या घडीला महाराष्ट्रात फक्त 18 मंत्री सरकार चालवत आहेत.
साधारणवेळी 43 मंत्र्यांपैकी 32 कॅबिनेट तर इतर 11 जण राज्यमंत्री राहतात. सध्या महाराष्ट्रात 18 कॅबिनेट मंत्री आहेत, पण एकही राज्यमंत्री नाही. यापैकी एकट्या एकनाथ शिंदेंकडे 10 तर देवेंद्र फडणवीसांकडे 7 खात्यांचा भार आहे.
एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदाबरोबरच नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, पणन, परिवहन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान, सामाजिक न्याय, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, सामान्य प्रशासन खात्यांचा भार आहे.
तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा, विधी व न्याय आणि राजशिष्टार असे 7 खाती आहेत.
एकाच व्यक्तीकडे असंख्य खाती आल्याचा ताण येतो, हे खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितल्याची माहिती बच्चू कडूंनी दिलीय. त्यामुळे लवकरात लवकर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचं आवाहन बच्चू कडूंनी केलंय.
याशिवाय भाजपकडून विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे सांस्कृतिक, चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण, विजयकुमार गावितांकडे आदिवासी विकास, गिरीश महाजनांकडे ग्रामविकास, मंगलप्रभात लोढांकडे पर्यटन, सुरेश खाडेंकडे कामगार, रविंद्र चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम तर अतुल सावेंकडे सहकार खातं आहे.
शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा, अब्दुल सत्तारांकडे कृषी, तानाजी सावंतांकडे आरोग्य, संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन, संदीपान भुमरेंकडे रोजगार हमी, उदय सावंतांकडे उद्योग, दिपक केसरकरांकडे शालेय शिक्षण, शंभुराज देसाईंकडे उत्पादन शुल्क आणि दादा भुसेंकडे बंदरांचं खातं आहे.
शिंदे-भाजप सरकारचा 30 जून 2022 ला शपथविधी झाला. तेव्हापासून 9 ऑगस्टपर्यंत म्हणजे जवळपास 50 दिवस शिंदे आणि फडणवीस हे दोनच मंत्री होते.
याआधी देशाच्या इतिहासात मंत्रिमंडळाविना सर्वाधिक काळ सरकार चालवण्याचा नकोशा विक्रम तेलंगणाच्या चंद्रशेखर राव यांच्या नावे आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर त्यांच्या सरकारचा विस्तार 66 दिवसानंतर झाला होता. तोपर्यंत तिथंही फक्त दोनच मंत्री होते.
सरकार स्थापना 30 जूनला झाली. पहिला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्टला झाला. मात्र आता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी याबाबत
फक्त अंदाज बांधले जातायत.
पहिल्या विस्तारात शिंदे आणि भाजपनं निम्मे म्हणजे 9-9 कॅबिनेट मंत्री बनले होते. दुसऱ्या विस्तारात भाजप आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे भाजपला जास्तीची खाती मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात एकूण 43 मंत्री असतात. त्यात 32 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्री. यापैकी 19 जण सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे कॅबिनेटची 12 मंत्रीपदं रिक्त आहेत. तर राज्यमंत्र्यांची 11. यात शिंदे गट आणि भाजप या दोघांकडून इच्छूकांचीही गर्दी मोठी आहे.
भाजपकडून चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे आणि सीमा हिरेंचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे.
शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी चर्चेत असणाऱ्यांमध्ये बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे आणि शहाजी पाटलांनीही मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवलीय.
दरम्यान, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भारत गोगावले ज्यादिवशी शपथ घेतील, त्यादिवशी जगातल्या कोणत्या कोपऱ्यात असलो तरी हजेरी लावेन, असं अजित पवार म्हटले होते. तो योग नेमका कधी येणार हे पाहणं महत्वाचं आहे.