बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढणार; गिरीश महाजन यांची मोठी माहिती
आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठी माहिती दिली आहे.
Badlapur Rape Case Ujjwal Nikam : बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास उशिर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. गेल्या 8 तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं.
“उज्ज्वल निकम यांना हा खटला चालवायला देणार”
“बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे. पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
“पीआयला निलंबित केलं. मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही. स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे. लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही. जे शक्यच नाही अशी मागणी मान्य करता येत नाही. घटना संतापजनक आहे. आमच्या मनातही तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा कायद्याने द्यावी लागेल. कसाबने एवढी माणसे मारली. पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली”, असेही गिरीश महाजन म्हणाले.
“मुली बऱ्या आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. सीसीटीव्ही फुटेज वापरले जात आहे. आमच्या ताब्यात द्या मारून टाकतो, असं म्हणत आहेत. पण कायद्याने तसं करता येत नाही. हेड कॉन्स्टेबल निलंबित केले आहे. लाडकी बहीणचं ट्विट केलं. ते रात्री केलं आहे. या घटनेचा काही लोक राजकीय फायदा घेत आहेत. तो घेऊ नये”, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.
आंदोलकांचा गिरीश महाजन यांना सवाल
“घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं?”, असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.
“ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे, ज्यांनी वेळकाढूपणा केला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांना सोडलं जाणार नाही. पोलिसांना सस्पेंड करता येईल. तात्काळ आरोपीला फाशी देता येत नाही. असा कायदा नाही. तुमचा राग मान्य आहे. तुमचा संताप मान्य आहे. योग्य आहे. पण आरोपीला थेट फाशी देता येत नाही. दोषी पोलिसांना आजच्या आज सस्पेंड केलं जाईल. आताच्या आता कारवाई करू. ज्यांनी केस घ्यायला उशीर केला, त्यांना सस्पेंड करू”, असं गिरीश महाजन यांनी आंदोलकांना वचन दिलं.