चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांना जामीन, त्यानंतर नेमकं काय घडलं
शाईफेक करण्यात आल्यानंतर कलम ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न करणे, असा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर वक्तव्य केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत मिरवणूक काढली. मनोज गडबडे, विजय ओव्हाड आणि धनंजय इजगज यांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली. त्यानंतर पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जामिनावर सुटका झालेल्यांना हार अर्पण केला. त्यानंतर फुलं उधळत शाईफेक करणाऱ्यांना खांद्यावर घेत जल्लोष करण्यात आला.
महापुरुषांबद्दलचे अपशब्द काढले तर ते सहन करून घेतले जाणार नाहीत. हे कालच्या प्रसंगातून सिद्ध झालेलं आहे. देशातील कायद्याच्या आधारे तीनही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे, असं जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, यासंदर्भात लावण्यात आलेली ३०७ ची केस ही चुकीचीच होती. सरकार हे मायबाप सरकार असतं. सरकार मायाळू, दयाळू, प्रेमळ पाहिजे. सरकारला राग येताच कामा नये.
चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
शाईफेक करण्यात आल्यानंतर कलम ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न करणे, असा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याविरोधात आवाज उठविण्यात आल्यानंतर सरकारनं ३०७ चा गु्न्हा मागे घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाईफेक करणाऱ्यांची जामिनावर सुटका झाली.
सत्तेचा गैरवापर करून खोटी कलमं लावण्यात आली होती. ही खोटी कलमं उठविल्यानंतर जामीन मिळाला. त्यानंतर तो कुटुंबीयांचा तो आनंद होता. ते काही भाजपला किंवा चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यासारखं नसल्याचं राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलंय.